सप्त ज्योतिर्लिंग महायात्रेसाठी विशेष ट्रेन; त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वरसह सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन
पर्यटकांसाठी ९०,९३० रुपयांत टूर पॅकेज; निवास, शाकाहारी भोजन आणि विम्याची मिळणार सुविधा

नाशिक : भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांनी धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘भारत गौरव डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन’द्वारे ‘सप्त ज्योतिर्लिंग महायात्रा’ जाहीर केली आहे. ११ दिवसांच्या या विशेष धार्मिक पर्यटन सहलीत महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर या तीन प्रमुख ज्योतिर्लिंगांसह मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आणखी चार ज्योतिर्लिंगांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. ही विशेष ट्रेन २५ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील एकूण सात ज्योतिर्लिंगांसह चार धामांपैकी एक असलेल्या द्वारकाधीश मंदिराचेही दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. आध्यात्मिक अनुभवासह धार्मिक पर्यटनाचा व्यापक लाभ भाविकांना मिळावा, या उद्देशाने या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या नियोजित कार्यक्रमानुसार भाविकांना उज्जैन येथील महाकालेश्वर, ओंकारेश्वर, गुजरातमधील नागेश्वर आणि सोमनाथ, तसेच महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि अखेरीस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यात्रेचा समारोप त्र्यंबकेश्वर येथे होणार असून, भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरासह पंचवटी परिसरालाही भेट देता येणार आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगांचा एका प्रवासात समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांचा समावेश असल्याने राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक महत्त्वाला अधिक बळकटी मिळेल, असेही मानले जात आहे. या महायात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक भाविक आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावर तसेच देशभरातील अधिकृत पर्यटन कार्यालयांमधून नोंदणी करू शकतात.
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष रेल्वे प्रवासात एसी-३, एसी-२ आणि एसी-१ श्रेणीतील आधुनिक डबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय तीन-स्टार हॉटेलमधील निवास, शुद्ध शाकाहारी भोजन, वातानुकूलित वाहनांद्वारे स्थानिक पर्यटन, प्रवास विमा आणि आयआरसीटीसीच्या टूर मॅनेजर्सची सुविधा पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. भारत गौरव योजनेअंतर्गत रेल्वेकडून सुमारे ३३ टक्के सवलत या पॅकेजवर देण्यात आली असून ती शुल्कात समाविष्ट करण्यात आली आहे. दुहेरी निवास व्यवस्थेसाठी एसी-३ श्रेणीचे प्रति व्यक्ती शुल्क ९०,९३० रुपये, एसी-२चे १,०९,९२५ रुपये, तर एसी-१चे १,१९,४२५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सात ज्योतिर्लिंगांसह द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष रेल्वे यात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.



