मृतांना ‘जिवंत’ दाखवून २.२९ कोटींची फसवणूक; गोव्यातून पाच जणांना अटक

नवी मुंबई : इस्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारातून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा पाच महिन्यांपासून तपास करणाऱ्या पनवेल शहर पोलिसांनी अखेर गोव्यातून पाच जणांच्या टोळीला अटक केली. करंजाडे येथील सर्वे क्रमांक ८१/२ मधील ४७ गुंठे जमीन नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम ऊर्फ सेलीम एलियाहू चिंचोलकर यांच्या मालकीची होती. हे दोघेही इस्रायलमध्ये वास्तव्यास होते. नाथन यांचे २०११मध्ये, तर शालोम यांचे २०१६मध्ये निधन झाले होते. त्यांचे वारसदार सध्या इस्रायल आणि अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आरोपी सुरज वासुदेव शिंदे याला मिळाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज शिंदे याने या माहितीचा गैरफायदा घेत कट रचला. त्याने स्वतःच्या वडिलांना नाथन चिंचोलकर, तर मेहुणा मनीष मनोहर मोरे याला शालोम चिंचोलकर म्हणून उभे केले. या दोघांच्या नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून संबंधित जमीन सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांना विकली. बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या या व्यवहारातून बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच सुरज शिंदे हा कुटुंबीय आणि साथीदारांसह फरार झाला. पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी त्याने वारंवार मोबाइल क्रमांक, राहण्याची ठिकाणे तसेच राज्ये बदलली. तपासादरम्यान आरोपी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याचा माग काढत पोलिसांनी गोव्यात शोधमोहीम राबवली. अखेर पाच महिन्यांच्या अथक तपासानंतर आरोपींना गोव्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील बनावट कागदपत्रे, जमीन व्यवहार आणि अन्य आर्थिक व्यवहारांचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



