जव्हार परिसरात मोठे भूस्खलन; सुदैवाने अनर्थ टळला, नागरिक भयभीत
मुसळधार पाऊस, भूकंपाच्या धक्क्यांमुळे आपटाळे धरणाजवळ रस्ता वाहून गेला

पालघर : यंदाच्या मुसळधार पावसासह जव्हार परिसरात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपटाळे धरणाजवळील डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने सुमारे २०० मीटर लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जव्हारजवळील राज्यमार्ग क्रमांक ७७ ते खडखड, कुंडाचा पाडा, आपटाळा, अळीव माळ, आखर साकुर या भागांना प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०७ शी जोडणाऱ्या रस्त्यावर २५ जुलैच्या रात्री मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या दुर्घटनेत डोंगरावरील २० मीटरपेक्षा अधिक उंचीवरील माती व मोठमोठे दगड कोसळून खाली आले. परिणामी सुमारे २०० मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून त्या ठिकाणी आठ ते दहा मीटर खोल दरीसदृश खड्डा निर्माण झाला आहे. भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगड आपटाळे धरणाच्या परिसरात जमा झाले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यासह धरणाकडे आणि परिसरातील दोन अंतर्गत रस्त्यांनाही फटका बसला आहे. सुदैवाने डोंगराच्या पायथ्याशी कोणतीही लोकवस्ती नसल्याने मोठी जीवितहानी टळली. माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती झाली नसली तरी या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने आपटाळे येथून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना झाप–जव्हार या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त अंतर आणि वेळ खर्च करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलन झालेल्या डोंगराच्या उर्वरित भागालाही मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. सध्या रस्त्यालगत साचलेला मातीचा ढिगारा हटविण्याचा प्रयत्न केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने कोणतीही जोखमीची कारवाई करण्यात आलेली नाही. या घटनेची पाहणी आयआयटीच्या तज्ज्ञांनी केली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील उपाययोजना निश्चित करण्यात येणार असल्याचे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सेलवास–जामसर–वावर या राज्यमार्ग क्रमांक ७२ वरही यंदा अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या आधारभिंती (रिटेनिंग वॉल) कोसळल्या असून वावर गावापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी साडेतीन फूट खोल भेग पडली आहे. त्यामुळे या मार्गावर सध्या एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुरुस्तीचे नियोजन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून जव्हार परिसरात जाणवणारे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंप आणि जुलै महिन्यात झालेला अतिवृष्टीचा पाऊस यामुळे यंदा भूस्खलनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.



