महाराष्ट्र

जागतिक स्तरावर चमकणार पुण्याचे ‘पुस्तक वैभव’; सांस्कृतिक वैभवात भर पडण्याचा चंद्रकांत पाटलांना दावा

पुणे : पुस्तकांची जागतिक राजधानी म्हणून पुण्याचा लौकिक निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, मागील वर्षी थोडक्यात संधी हुकल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, यंदा निश्चितच पुण्याच्या नावावर पुस्तकांची जागतिक राजधानी म्हणून शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (NBT) पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे शुक्रवारी बाणेर येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील बोलत होते. या प्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

पुणे पुस्तक महोत्सवाला गेल्या वर्षी तब्बल १५ लाख नागरिकांनी भेट दिली होती. या महोत्सवातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे पश्चिम प्रादेशिक कार्यालय पुण्यात सुरू व्हावे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. कर्नल युवराज मलिक यांनी सांगितले की, पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र पुण्यात साकारले जाणार आहे. येथे दर आठवड्याला शनिवार आणि रविवार रात्री पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच माता जिजाबाई सेंटर ऑफ एक्सलन्सही येथे कार्यरत होणार असून, देशभरातून नागरिक या केंद्राला भेट देतील. मिलिंद मराठे म्हणाले की, राष्ट्रीय हातमाग दिन आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. या केंद्राची संकल्पना ‘स्क्रीन टाइम टू अॅक्टिव्हिटी टाइम’ अशी असेल.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते १५ ऑगस्टदरम्यान पुण्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम ‘न भूतो न भविष्यति’ ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विभागीय कार्यालय पुण्यात व्हावे, हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आगामी महोत्सवासाठी आतापर्यंत १,२०० स्टॉल बुक झाले असून, हा आकडा वाढत आहे. पुणेकरांचा प्रतिसाद लक्षात घेता लवकरच पुस्तकांचा आठवडे बाजारही भरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button