Uncategorized

श्री गुरू तेग बहादूर यांचे बलिदान मानवी हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ : राज्यपाल

नवी मुंबई : इतर धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरू तेग बहादूर यांचे जीवन केवळ इतिहासाचा भाग नसून, आधुनिक धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील एका विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहादत दिनानिमित्त नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पंजाब हेरिटेज भवन येथे ‘श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनावरे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्षा कुमुद शर्मा यांच्यासह साहित्यिक, विद्वान आणि शीख समाजातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि पंजाबमधील शतकानुशतकांच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करताना राज्यपालांनी संत नामदेव महाराजांच्या पंजाबमधील कार्याची आठवण करून दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या भूमीतून नामदेव महाराजांनी भक्तीचा संदेश पंजाबमध्ये पोहोचवला. त्यांच्या रचना आजही ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’मध्ये आदराने स्थान मिळवून आहेत. पुढे श्री गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रातील नांदेड येथे आले आणि ‘तख्त श्री हजूर साहिब’ या बंधाची साक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री गुरू तेग बहादूर यांनी १६७५ मध्ये दिलेले बलिदान भारताच्या नागरी आणि सांस्कृतिक इतिहासातील अद्वितीय अध्याय असल्याचे राज्यपाल म्हणाले. प्रत्येक व्यक्तीला भीतीविना आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे, या सार्वभौम मूल्याच्या रक्षणासाठी गुरूंनी ‘हिंद दी चादर’ म्हणून बलिदान दिले. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी आपल्या जीवनातून आधीच प्रत्यक्षात आणली होती, असेही त्यांनी नमूद केले.

गुरूजींचे विचार केवळ चर्चासत्रांपुरते मर्यादित न राहता पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थात्मक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे राज्यातील ६५ सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ सुरू करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. हे अध्यासन आंतरधर्मीय संवाद, संशोधन, अध्यापन आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रसार करणारे कायमस्वरूपी केंद्र ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ध्वनी संदेशाद्वारे गुरू तेग बहादूर यांचे बलिदान मानवी स्वातंत्र्याचे अमर प्रतीक असल्याचे सांगितले. दरम्यान, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी देशभरातील पाच प्रमुख केंद्रांवर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रांच्या मालिकेतील हे तिसरे चर्चासत्र असल्याचे सांगितले. गुरूजींचा महान वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा प्रा. कुमुद शर्मा यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button