राज्यात १०० महिलांमागे नऊ महिला तंबाखूचे सेवन करतात; ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण अधिक

पुणे : राज्यातील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-6) २०२४ मधून समोर आले आहे. राज्यातील प्रत्येक १०० महिलांमागे जवळपास नऊ महिला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत तब्बल अडीचपट अधिक असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या सहाव्या अंकातील आकडेवारीनुसार, राज्यातील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे एकूण प्रमाण ८.८ टक्के आहे. यामध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण ११.८ टक्के, तर शहरी भागात ४.५ टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. ग्रामीण महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पुरुषांमध्ये तंबाखूचे व्यसन महिलांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक असल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३१.३ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. त्यामध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण ३८.१ टक्के, तर शहरी भागात २१.९ टक्के आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखूचे सेवन सुमारे साडेतीनपट अधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
मद्यपानाच्या बाबतीत मात्र महिलांमध्ये प्रमाण अत्यल्प आहे. राज्यातील केवळ ०.३ टक्के महिला मद्यपान करतात, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १२.२ टक्के आहे. ग्रामीण भागातील १३.१ टक्के आणि शहरी भागातील ११ टक्के पुरुष मद्यपान करतात. म्हणजेच पुरुषांमध्ये मद्यपानाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत जवळपास ४० पट अधिक असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तंबाखू सेवनाच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या अंकात महिलांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण ११ टक्के होते. ते आता ८.८ टक्क्यांवर आले आहे. पुरुषांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण ३३.८ टक्क्यांवरून ३१.३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे व्यसनाचे प्रमाण कमी होण्याची सकारात्मक चिन्हे दिसत असली, तरी ते अद्यापही चिंताजनक पातळीवर कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखू आणि मद्यपानामुळे कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, आरोग्य शिक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.



