बीकेसीसाठी मोठी वाहतूक योजना; कुर्ला-सायन-चुनाभट्टीला जोडणारे पूल, नव्या रेल्वे स्थानकाचीही चर्चा

मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुर्ला, सायन आणि चुनाभट्टी या परिसरांना बीकेसीशी जोडणारे पादचारी पूल उभारण्याबरोबरच सायन-कुर्लादरम्यान ‘बीकेसी रोड’ नावाचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याची कल्पनाही चर्चेत आली आहे. या प्रस्तावामुळे बीकेसीत दररोज ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापना असल्याने दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिक येथे येतात. सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानके बीकेसीच्या तुलनेने जवळ असली, तरी या स्थानकांपासून बीकेसीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी आणि बसवर अवलंबून राहावे लागते. या मार्गांवर वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, गर्दी आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यात रिक्षा-टॅक्सीच्या मनमानी भाड्याचाही सामना करावा लागतो.
रेल्वे आणि प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करणाऱ्या वीरेश नारकर यांनी कुर्ला, सायन आणि बीकेसी परिसराचा अभ्यास करून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सायन आणि कुर्ला स्थानकांदरम्यान ‘बीकेसी रोड’ हे नवीन स्थानक उभारण्याची कल्पना मांडली आहे. या स्थानकाला बीकेसीशी जोडण्यासाठी ट्रॅव्हलेटर असलेला पादचारी पूल उभारल्यास प्रवाशांना कमी वेळेत बीकेसीमध्ये पोहोचता येईल, असा त्यांचा दावा आहे. हाँगकाँग आणि शेंझेन येथील पादचारी वाहतूक व्यवस्थेची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. दरम्यान, सायन-कुर्लादरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारणे हे मात्र सोपे काम नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असून मुख्य मार्गासह हार्बर मार्ग, मिठी नदीवरील पूल आणि गुंतागुंतीची ट्रॅक रचना आहे. त्यामुळे विद्यमान रेल्वे वाहतुकीला बाधा न आणता नवीन प्लॅटफॉर्मसाठी जागा उपलब्ध करणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान ठरणार आहे. तसेच हा प्रकल्प खर्चिकही ठरू शकतो.
‘वॉकिंग प्रोजेक्ट’च्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी बीकेसीला कुर्ला, सायन आणि चुनाभट्टीशी जोडण्यासाठी महत्त्वाचे पादचारी पूल उभारण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच वांद्रे आणि कुर्ला स्थानकांना उपनगरीय रेल्वेमार्गे जोडण्याची योजनाही यापूर्वी चर्चेत होती. बीकेसी परिसराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता नवीन रेल्वे स्थानकाची कल्पना चांगली असल्याचे प्रा. डॉ. जालिंदर अडसूळ यांनी सांगितले. बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना भविष्यातील वाहतुकीचा विचार करून रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी जागा निश्चित करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मतही व्यक्त होत आहे.



