गुन्हेमहाराष्ट्र

८ कोटींची खंडणी अन् १० लाखांचा हप्ता; बांधकाम व्यावसायिकाला लुटणारा त्रिकूट जाळ्यात!

ठाणे : कळवा येथील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ईडी, सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा तसेच न्यायालयीन कारवाईची धमकी देत तब्बल ८ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली. आरोपी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष मनोहर बावडेकर (वय ४७, रा. कळवा), सिद्धेश हरीशचंद्र बेंडकोळी (वय ३५, रा. कळवा) आणि इम्तियाज इलियास मोमीन (वय ३१, रा. सांगली) यांचा समावेश आहे. कळवा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सौरभ नंदकुमार साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथील ‘केशव हाईट्स’ या इमारतीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या नोटरीच्या आधारे संतोष बावडेकर याने साळवी यांना विविध केंद्रीय तपास यंत्रणा आणि शासकीय विभागांकडे तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी दिली होती. तसेच ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आणि ईडी, सीबीआय तसेच इतर विभागांकडे कोणतीही तक्रार न करण्याच्या बदल्यात सुमारे साडेचार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याशिवाय, संपूर्ण प्रकरण अधिकृत करून देण्याच्या नावाखाली आणखी चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. अशा प्रकारे आरोपींनी एकूण ८ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. तपासासाठी तक्रारदाराला ध्वनिमुद्रक (व्हॉइस रेकॉर्डर) देण्यात आला होता. त्यामध्ये आरोपींकडून खंडणीची मागणी होत असल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.

त्यानुसार ३० जुलै रोजी कळवा येथील केशव हाईट्समधील तक्रारदाराच्या कार्यालयात आरोपी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आले. त्यांनी रक्कम स्वीकारताच आधीपासून दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान १० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(६) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींच्या पार्श्वभूमीचा तसेच या खंडणी प्रकरणामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button