गुन्हेमहाराष्ट्र

खेड पोलिसांची मोठी कारवाई; १३ सराईत गुन्हेगार तडीपार, दोघांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

पुणे : खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या एकूण १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, दोन धोकादायक गुन्हेगारांना महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. खेड पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील १२ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविले होते. तसेच एका गुन्हेगाराचा प्रस्ताव खेड उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावांवर निर्णय घेत पोलीस अधीक्षकांनी १२ गुन्हेगारांना पुणे जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचे आदेश दिले, तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एका गुन्हेगाराला पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर तडीपार केले. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये मनोज माणिक हजारे, निखील नवनाथ गोगावले, राकेश पांडुरंग हजारे, गणेश दत्तात्रय गावडे, गौरव राम हजारे (सर्व रा. कनेरसर), तसेच रोहन उर्फ जग्गु अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दिपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ वाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे, नवनाथ नामदेव गिऱ्हे (सर्व रा. आंबोली) आणि राजेंद्र उर्फ राजू गेणभाऊ करंडे (रा. करंडेवस्ती, राजगुरुनगर) यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रविण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (रा. वाळद) आणि संकेत सुनिल होले (रा. राक्षेवाडी) या दोन धोकादायक व्यक्तींवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांना एक वर्षासाठी अनुक्रमे नागपूर आणि अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. आणखी काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात एमपीडीए आणि तडीपारीचे प्रस्तावही प्रक्रियेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणाऱ्या किंवा भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, पुनाजी जाधव, सहायक पोलीस फौजदार शंकर भवारी तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button