महाराष्ट्रमुंबई

मुंबई पोलिसांच्या कथित वेतन घोटाळ्याचा तपास वेगात; डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कथित वेतन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला असून, डिजिटल पुराव्यांच्या आधारे संपूर्ण गैरव्यवहाराचा मागोवा घेतला जात आहे. तपासात ठोस पुरावे हाती आल्यानंतर संबंधित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कथित १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन जमा झाल्याचा संशय असलेल्या बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांकडून सेवार्थ प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक नोंदी, युजर लॉगिन, सर्व्हर लॉग, वेतन मंजुरीशी संबंधित डिजिटल माहिती आणि डेटा फेरफाराचा तपशील तपासला जात आहे. विशेषतः ऑडिट ट्रेल, चेंज हिस्ट्री आणि प्रणालीतील बदलांची माहिती पडताळून कर्मचारी माहितीमध्ये नेमक्या कोणत्या टप्प्यावर फेरफार करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. तपास पथक संबंधित अधिकाऱ्यांचे लॉगिन वापरून वेतन मंजुरीची प्रक्रिया कशी पूर्ण करण्यात आली, याचाही तपास करत आहे. मूळ नोंदी आणि त्यानंतर बदललेल्या नोंदींची तुलना करून कोणत्याही प्रकारचा अनधिकृत हस्तक्षेप किंवा डेटा फेरफार झाला होता का, याची बारकाईने छाननी सुरू आहे.

याशिवाय, ज्या बँक खात्यांमध्ये कथित वेतनाची रक्कम जमा झाली, त्या खात्यांचा आर्थिक मागोवाही घेतला जात आहे. खाते उघडताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे, खातेदारांची ओळख, वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतर ती पुढे कोणत्या खात्यांमध्ये हस्तांतरित झाली आणि त्या व्यवहाराचा अंतिम लाभार्थी कोण होता, याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासली जात आहे. संबंधित खातेदारांची चौकशीही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास केवळ गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींपुरता मर्यादित राहणार नाही. डिजिटल पुरावे, बँक व्यवहार आणि चौकशीतून समोर येणाऱ्या नव्या धाग्यांच्या आधारे इतर अधिकारी, कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्तींचा या गैरव्यवहारात सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित विभागातील काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू आहे. या चौकशीतून प्रशासकीय पातळीवरील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

मुंबई पोलिसांच्या वेतन व्यवस्थापनाशी संबंधित या प्रकरणामुळे पेरोल प्रणालीची सुरक्षितता, अंतर्गत लेखापरीक्षणाची परिणामकारकता आणि आर्थिक नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे तपासाचा निष्कर्ष आणि त्यानंतर होणारी कारवाई याकडे पोलीस दलासह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button