समुद्रात उभारणार ९ कोटी प्रवासी क्षमतेचे विमानतळ; डीपीआर प्रक्रिया सुरू

ठाणे : मुंबई आणि नवी मुंबईनंतर मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील कोरे बीचजवळ समुद्रात भराव टाकून तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर या विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता तब्बल ९ कोटी इतकी प्रस्तावित आहे. हा प्रकल्प केवळ विमानतळापुरता मर्यादित नसून वाढवण बंदर, महामार्ग आणि रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर यांना जोडणारे बहुविध वाहतूक केंद्र (मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब) म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. पूर्व-व्यवहार्यता अभ्यासात कोरे बीच परिसरातील समुद्रातील जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. प्रस्तावित विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या, समांतर टॅक्सीवे, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, कार्गो व लॉजिस्टिक हब, विमान देखभाल-दुरुस्ती सुविधा आणि व्यावसायिक विकास क्षेत्र उभारण्याची योजना आहे. २०५० पर्यंत मुंबई परिसरातील विमानतळांवरील वाढता ताण कमी करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
वाढवण बंदराच्या विकासासोबत हा विमानतळ उभारल्यास बंदर, विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे यांचे एकात्मिक वाहतूक जाळे निर्माण होईल. त्यामुळे मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, गोदामे, निर्यात-आयात व्यवसाय आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जमिनीची कमतरता आणि वाढती हवाई वाहतूक लक्षात घेऊन जपान, हाँगकाँग, मकाऊ, चीन आणि तुर्कीसह अनेक देशांनी समुद्रात कृत्रिम बेटांवर विमानतळ उभारले आहेत. मात्र अशा प्रकल्पांमध्ये समुद्रपातळी वाढ, भरावाची जमीन खचणे आणि देखभालीचा वाढीव खर्च ही मोठी आव्हाने असतात. पालघरच्या प्रस्तावित ऑफशोअर विमानतळासाठीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.



