गुन्हेमहाराष्ट्र

भिवंडीतील ‘राजवीर तरे’ चे खरे नाव ‘मिझानूर रहमान’ असल्याचा आरोप; विवाहितेची नेरळ पोलिसांत तक्रार

ठाणे : भिवंडीत राहणाऱ्या राजवीर तरे नावाच्या व्यक्तीचे खरे नाव मिझानूर रहमान असल्याचा धक्कादायक आरोप एका विवाहितेने केला आहे. मिझानूरने राजवीर तरे या नावाने इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्न करून बळजबरीने धर्मांतर केल्याचा आरोप पीडितेने केला असून, याप्रकरणी तिने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर मिझानूर आपल्या मुलाला घेऊन बेपत्ता झाल्याचेही तिने म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडीतील राजवीर तरे नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर राजवीरने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत लग्नाची मागणी घातली. लग्नाची बोलणी सुरू असताना तो राजवीर तरे नसून मिझानूर रहमान असल्याचे पीडितेला समजले. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला.

मात्र, मिझानूरने आपण कोणताही धर्म पाळत नसल्याचे सांगून तिची समजूत काढली. तसेच, तिने तिच्या धर्माप्रमाणेच राहावे, असे आश्वासन दिल्याचा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव वाढवण्यात आला. मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन अखेर तिचे धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. धर्मांतरानंतर तिचे नाव झोया मिझानूर रहमान ठेवण्यात आले. या दांपत्याला मुलगाही झाला. झोया मिझानूरने पतीचा मोबाईल तपासला असता तो आणखी चार हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्याकडून आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचा संशय तिला आला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याची तयारी केली. दरम्यान, मिझानूर आपल्या मुलाला घेऊन घरातून निघून गेल्याचा आरोपही झोयाने केला आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांच्या तपासानंतर या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button