‘मळके कपडे, साधा लूक अन् लाखोंची चोरी’; मध्य प्रदेशातून मुंबईत येणाऱ्या ३ महिला टोळीला अटक!
मुंबई : गर्दीच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांना हेरून चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशामधील राजगड जिल्ह्यातील या महिला काही दिवस मुंबईत मुक्काम करून गर्दीच्या ठिकाणी चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अवघ्या दोन दिवसांत अंधेरी परिसरात दोन चोऱ्या करून त्यांनी तब्बल 3.75 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे. सोनम बनेरी (वय ३७), अनमोल जगवीर सिंह सिसोदिया (वय २७) आणि श्वेता सिसोदिया (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे तिन्ही महिला एकाच गावातील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला दर काही महिन्यांनी मुंबईत येत असत. शहरात आल्यानंतर त्या आठवडाभर किंवा १५ दिवस लॉज अथवा हॉटेलमध्ये मुक्काम करत. त्यानंतर गर्दीच्या बाजारपेठांमध्ये फिरून चोरीसाठी योग्य व्यक्ती हेरत. साधे आणि मळकट कपडे परिधान करून त्या गर्दीत मिसळत असल्याने नागरिकांना त्यांच्यावर संशय येत नसे. मुंबईचा प्रवासही त्या प्रामुख्याने अनारक्षित रेल्वे डब्यातून करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या महिलांची चोरीची पद्धतही पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तिघी मिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करत. त्यापैकी एक महिला संबंधित व्यक्तीचे लक्ष विचलित करत असे. त्याचवेळी दुसरी महिला संधी साधून पर्स, रोख रक्कम अथवा दागिने लंपास करत असे. तिसरी महिला आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून पोलिस किंवा अन्य व्यक्तींचा धोका नाही ना, याची पाहणी करत असे. चोरीनंतर मिळालेला माल आणि रक्कम तिघीही समान वाटून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या तिघींचे पती गावी राहून शेती करत असून मुलांचा सांभाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर या महिला मुंबईत येऊन चोरी करत असल्याचा आरोप आहे. ७ ऑगस्ट रोजी अंधेरी मार्केटमधील जागृती स्वीट्समध्ये ४५ वर्षीय पारिजात गावली खरेदी करत असताना त्यांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे लक्ष विचलित करून पर्समधून सुमारे ३ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अंधेरी पश्चिम येथील मनीष मार्केटमध्ये ३१ वर्षीय वासुदेवी सितावडेकर यांच्या पर्समधून ७५ हजार रुपये रोख रक्कम चोरी करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ३.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
दोन्ही घटनांनंतर डी. एन. नगर पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित महिलांच्या मोबाइल क्रमांकांशी संबंधित तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या हालचालींचा माग काढला. चोरीचा माल घेऊन त्या मुंबईबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात त्यांचा माग काढण्यात आला. स्थानकाजवळील एका लॉजमध्ये त्या थांबल्या असल्याचे आढळून आले. डी. एन. नगर पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलिसांच्या महिला पथकाच्या मदतीने कारवाई करत तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपये रोख आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. हा मुद्देमाल अंधेरीतील दोन्ही चोरीच्या घटनांशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिन्ही महिलांनी ही आपली पहिलीच चोरी असल्याचा दावा केला असला, तरी त्यांची काम करण्याची पद्धत आणि मोडस ऑपरंडी पाहता त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



