महाराष्ट्रमुंबई

पुणे, नाशिकसह राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमचे रद्द

४३४ आयुर्वेदिक औषध संस्थांची तपासणी, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३५ संस्थांना 'कारणे दाखवा' नोटीस

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० तसेच ‘शेड्युल टी’मधील ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यभरातील ४३४ परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान कारखाना परिसरातील स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण विभाग, औषध चाचणीच्या नोंदी, एसओपी तसेच उत्पादनांच्या लेबलची कसून तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३५ आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

 तपासणीत गंभीर त्रुटी उघड – तपासणीदरम्यान मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती गैरहजर असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. काही ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण विभागच नसल्याचे, तसेच औषध चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. उत्पादन परिसरातील अस्वच्छता आणि लेबलवर चुकीच्या उत्पादन तारखा छापल्याचेही आढळले. याशिवाय कच्च्या व तयार मालाच्या चाचण्यांचे अभिलेख, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदींचा अभाव आढळला. विविध औषधांचे घटक एकमेकांत मिसळू नयेत यासाठी आवश्यक ‘क्रॉस-कंटॅमिनेशन एसओपी’ही काही ठिकाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि औषध उत्पादनाच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही उत्पादकाची गय केली जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

या १० कंपन्यांचे परवाने रद्द

१ . मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे
२. मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया
३. मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
४. मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
५. मे. कालिदास गांधी – पुणे
६. मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक
७. मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
८. मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती
९. मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
१०. मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button