महाराष्ट्र

तरूण- तरूणींनी सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे अवाहन

पुणे : ड्रग्ज तसेच कोणताही अवैध प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केले. सोबतच त्यांनी सोशल मिडीया वापरताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये, यासाठी तुम्हीच तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या, असा सल्लाही दिला. हडपसर येथील मगपट्टासिटीत आयटी कंपन्या तसेच त्यात काम करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी मगरपट्टा सीटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोजकुमार पाटील, परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, की तुमच्या आजुबाजूला अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या. शहरातूनच पोलिसांनी ड्रग तस्करीचे मोठे रॅकेट मागील वर्षात उध्वस्त केले. आंतरराष्ट्रीय स्थरावर ते चालविले जात होते. यामध्ये ३ हजार ७०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. दरम्यान, आम्ही ड्रग्जफ्री सिटीनुसार काम करत आहोत. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आजु बाजुला असे ड्रग्ज किंवा काही अवैध प्रकार आढळून आल्यास आम्हाला कळवा. पोलीस आणि नागरिकांनी एकत्रित काम केल्यास अशा अवैध प्रकारांना आळा बसू शकेल. नुकत्याच येरवडा परिसरात घडलेल्या त्या तरूणीच्या खुनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी उपस्थित तरुण-तरुणींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कंपन्यांनी महिलांच्या, तरूणींच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांचे काटेकोर पालन करावे, असे सूचित केले. पोर्शे कार अपघातानंतर एका स्टँडअप कॉमीडीअनकडून पोर्शे कारमधील आरोपी सुटल्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेताना पोर्शे अपघातात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळला ते गेली आठ महिन्यापासून कारागृहात असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. त्यांना अद्यापपर्यंत जामीन मिळाला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडे हडपसर परिसरातील वाहतुक कोंडी, शाळेभोवती असलेल्या टपर्‍या, रस्त्याने फिरणारे रोडरोमीओ अशा तक्रारी केल्या. तेव्हा पोलीस आयुक्तांनी तात्काळ यावर कारवाई करण्याचे सूचना दिल्या.

पुणे शहरातील बहुसंख्य शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपर्‍या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याच टपर्‍यावर शाळकरी मुले येरजार्‍या मारताना तसेच सिगारेट सारखी व्यसने करतना आढळून आले आहे. याकडे नागरिकांनी प्रश्नाद्वारे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळांच्या शंभर मिटर परिसरातील अनिधिकृत टपर्‍या उखडून टाकण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी धडक आदेश देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button