महाराष्ट्र

महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई; तब्बल ५२ लाखांचा दंड केला वसूल

पुणे : शहरात अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजी सुरू असतानाच अनधिकृत फ्लेक्स विरोधात महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह  विभागाने कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात एकूण ५२ लाख रुपयाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ११० जणांविरुद्ध कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील  सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.  उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७ मध्ये अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध कारवाई  करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या वर्षी असेच आदेश जारी केले आहेत.  त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारले जाणार्या होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध  मागील तीन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे, त्याअंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४४९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात  दुसरी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६५९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्यात आले.  कारवाईत सातत्य ठेवून  ५२लाख ३२ हजार रुपये इतका  दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ११० व्यक्ती संस्था, नागरीक, व्यावसायिक यांचेवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हे केले आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी दिली. सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांची जबाबदार तथा अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असुन त्यांचेवर नियंत्रण ठेवणेकामी संबंधित उप आयुक्त परिमंडळ क १ ते ५ यांची नोडल / पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

नागरिकांना अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बैनर याबाबत तक्रार करावयाची असल्यास.. 

  • पीएमसी केअर ऐप, W-Web-pmc.gov.in,
  • कॉल सेंटर (18001030222) ,
  • व्हॉट्सॲप -9689900002,
  • ईमेल feedback@punecorporation.org येथे तक्रार करावी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button