महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक गाव एक पोलीस पाटील’ योजना केली सुरू

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाने पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, जिल्ह्यात ‘एक गाव एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार’ ही नवीन तंत्रज्ञान-सक्षम योजना जिल्ह्यामध्ये सुरू केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ३३ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत १५७४ गावे आहेत. गावाच्या परिसरात वाडी, वस्ती आहेत. या योजनेत १२९२ पोलीस पाटील, १५२५ पोलीस अंमलदार हे प्रत्येक गावाकरता नेमण्यात आले आहेत. ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या ॲपद्वारे पोलीस पाटील आणि पोलीस अंमलदारांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
‘एक गाव आणि बारा भानगडी’ असं म्हणत गावातील भांडणातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय गावातील पोलीस पाटील आणि पोलीस अंमलदारांमध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याकरता, पोलीस आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करुन, सामुदायिक पोलीसिंगला चालना देणे, महिला व बालकांच्या संबंधित गुन्ह्यामध्ये तातडीने कारवाई करणे. त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या अॅपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांनी गाव भेटी देताना, त्यांचं जिओ टंग लोकेशन आणि फोटो अपलोड करणं अपेक्षित आहे, जेणेकरुन प्रभावीपणे ही योजना अंमलात आणता येईल, असं यावेळी पंकज देशमुख म्हणाले.
“गावागावातील वाड्यावस्त्यांपर्यत ‘एक गाव एक पोलीस पाटील’ या योजनेच्या माध्यमातून पोलीस पोहोचणार आहेत. ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये संवाद (कम्युनिटी पोलिसिंग) वाढण्यास मदत होणार आहे. महिला आणि बालकांवरील अत्याचारांचे गुन्हे, तसेच गंभीर गुन्ह्यांची माहिती त्वरित मिळणार असून, त्या माध्यमातून प्रभावी कारवाई शक्य होणार आहे.” – पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस


