विरार इमारत दुर्घटनेला जबाबदार धरून गिल्सन गोन्साल्विस यांच्यावर अटकेची कारवाई

विरार : अनधिकृत इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची दुर्घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती.या इमारत दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून गुन्हे शाखा युनिट ३ ने या घटनेच्या तपासात महापालिकेचे प्रभाग समिती (सी ) चे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे. पालिका अधिकाऱ्याला अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही ४ मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुघटनेने संपूर्ण शहर हादरले होते. रमाबाई अपार्टमेंट ही ४ मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या. मात्र अवघ्या काही वर्षातच ही इमारत जीर्ण झाली होती. विकासकाने इमारतीच्या रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवाशी कर भरत होते. या दुर्घनटेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागा मालकासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखा युनिट-३ कडे सोपविला. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी विकासकासह पाच आरोपींना अटक केली होती. त्यापैकी चार आरोपींना जामीन मिळाला असून, विकासक नितल साने (४८) अजूनही तुरुंगात आहे. या प्रकरणाची चौकशी करत असतानाच गुन्हे शाखा युनिट ३ ने आता महापालिकेच्या प्रभाग (सी) चे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्यावर महिनाभरापूर्वी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू होती. गुरुवारी सुद्धा त्यांना गुन्हे शाखेने चौकशी साठी बोलावले होते. मात्र आठ ते दहा तास झालेल्या चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. विरार इमारत दुर्घटने प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्याला अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेच्या तपासामध्ये असे दिसून आले की, इमारत जीर्ण झाल्यावर मे २०२५ मध्ये सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांनी इमारतीला नोटीस पाठविली होती. परंतु त्यानंतर ती इमारत रिकामी का करून घेतली नाही आणि विकासकावर त्याच वेळी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा का दाखल केला नाही? त्याच वेळी इमारत रिकामी केली असती, तर १७ लोकांचा जीव वाचला असता. मात्र गोन्साल्विस यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केला असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट ३ ने या संपूर्ण प्रकरणात पुरावे आणि जबाबांच्या आधारावर चार हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.या प्रकरणात महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांची ही चौकशी सुरू असून जर त्यात ते दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर ही गुन्हा दाखल केला जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले आहे.


