महाराष्ट्र

जव्हारमध्ये मतदानाचा उच्चांक, जिल्ह्यात मात्र ६८.२९ टक्क्यांवर समाधान

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर सह डहाणू व जव्हार नगरपरिषदेसाठी तसेच वाडा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ६८.२९ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. चार शहरातील थेट नगराध्यक्ष तसेच ९२ प्रभागांसाठी नगराध्यक्ष पदाचे ३४ तसेच नगरसेवक पदासाठी ४५९ अशा एकूण ४९३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आह. जव्हार नगर परिषदेत सर्वाधिक ८२.९४ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रभागात असणारे विविध राजकीय पक्षांचे प्रभुत्व व त्या ठिकाणी झालेले मतदान यावर निवडणुकीच्या निर्णयाविषयी अंदाज बांधले जात असून २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी पर्यंत सर्वच उमेदवारांच्या व त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये धाकधूक कायम राहणार आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या ५९७५३ पुरुष, व ५६८६६ महिला व ३२ तृतीयपंथी मतदारांपैकी दोन तृतीयपंथी मतदारांसह ४०६६६ पुरुष व ३८९९१ महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. एकूण एक लाख १६ हजार ६५१ मतदारांपैकी ७९६५९ मतदारांनी (६८.२९ टक्के) चार शहरांतील निवडणूक प्रक्रियेच्या सहभाग घेतल्याचे दिसून आले. ९३४७ मतदार असणाऱ्या जव्हार नगर परिषदेत ८२.९४ टक्के मतदान नोंदवण्यात आले असून त्यामध्ये महिलांचा सहभाग (४०१६) हा पुरुष मतदारांपेक्षा (३७२९) अधिक असल्याचे दिसून आले आहे. तर १२८९३ मतदार असणाऱ्या वाडा नगरपंचायतीसाठी ७४.७८ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे. ३८६९३ मतदार असणाऱ्या डहाणू नगरपरिषदेसाठी ६७.२३ टक्के तर ५५७२७ मतदार असणाऱ्या पालघर नगर परिषदेसाठी केवळ ६५.०७ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे. कमी मतदार संख्या असणाऱ्या जव्हार व वाडा शहरांमध्ये मतदाराला मोठ्या प्रमाणात आमिष दाखवण्यात आले होते. काही ठिकाणी प्रतिमतदार ३० ते ४० हजार रुपये वाटप केल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरासरी या दोन शहरांमध्ये सात ते १० हजार रुपये प्रति मत या दराने लक्ष्मी दर्शन झाल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच या दोन शहरातील मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची संख्या अत्यल्प असल्याचे व मतदार याद्यांमध्ये सुसूत्रपणा असल्याचे दिसून आले. यामुळे या दोन्ही शहरात जिल्ह्यातील सरासरी मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याचे दिसून आले आहे. पालघर व डहाणू येथील मतदार याद्या सदोष असल्याचे दिसून आले होते. त्यामध्ये मयत असलेल्या नागरिकांची नावे, मतदारांच्या दुबार नोंदी तसेच कामावर इतरत्र जाणारे अथवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. अनेक मतदारांसमोर त्यांच्या अधिवासाचे पत्ते मोघम असल्याने त्यांचा अखेरपर्यंत शोध घेणे उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांना शक्य झाले नाही.

काही ठिकाणी मतदारांचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदाराला मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या बूथवर चक्कर मारणे भाग पडले होते. या खेरीस शहरी भागांमध्ये अनेक ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांच्या सावधगिरीच्या दृष्टीने मतदारांच्या पुराव्यांची पडताळणी अधिक चौकसपणे केली जात असल्याने मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा सायंकाळपर्यंत लागल्याचे दिसून आले होते. याचा परिणाम देखील काही प्रमाणात मतदानावर झाल्याचे सांगितले जात आहे. प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून वेगवेगळ्या प्रभागांमध्ये झालेल्या मतदानाचा तपशील उपलब्ध झाला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये तसेच प्रभागांमध्ये असणारे विविध राजकीय पक्षांचे प्राबल्य याचा अंदाज बांधून निवडणूक निकालाचे अंदाज बांधायला राजकीय पक्षांची मंडळी लागली आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरणानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून आले आहे. या आधारावरच निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याने आपल्याला निवडणुकीत विजयासाठी लागणाऱ्या मतांचा ताळेबंद मांडला होता. मात्र पालघर व डहाणू मध्ये कमी झालेले मतदान तर जव्हार व वाडा येथे वाढीव मतदान कोणाच्या हिताचे ठरणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवाय मतमोजणी २१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button