नवी मुंबई विमानतळात प्रीपेड टॅक्सी-रिक्षांचा थांबा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन अवघे सहा दिवस झाले असतानाच प्रवाशांच्या सोयीसाठी राज्याच्या परिवहन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील पहिला प्रीपेड टॅक्सी व तीन आसनी रिक्षांचा थांबा विमानतळात सुरू होणार आहे.
पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) या थांब्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी या प्रीपेड टॅक्सी थांब्यांची नुकतीच स्थळपाहणी केली. यानंतर पनवेल प्रादेशिक विभागाच्या कार्यालयाने विमानतळ परिसरातील परिवहनाचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांना या थांब्यांची तातडीने व्यवस्था करण्याचे पत्र दिले आहे. दरम्यान, ओला व उबेर या खासगी कंपन्यांच्या तुलनेत प्रीपेड टॅक्सीचे दर जास्त असल्याने ही सेवा येथे किती यशस्वी होते याबाबत साशंकता असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भाडेदरांनुसार, प्रीपेड टॅक्सीसाठी ६ किमीपर्यंत १५५ रुपये, तर प्रीपेड ऑटो-रिक्षासाठी १२९ रुपये आकारले जाणार आहेत. अंतर वाढल्यास ठरावीक टप्प्यानुसार भाडेवाढ निश्चित करण्यात आली असून, पुढे दर २ किमीच्या स्लॅबनुसार आकारणी होणार असल्याची माहिती पनवेलचे प्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण यांनी दिली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पनवेल व उरण परिसरातील प्रवाशांना होणार आहे. पनवेल हे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महत्त्वाचे शहर बनले असले तरी येथे तीन आसनी रिक्षांचा मीटर अद्याप डाऊन झालेला नाही. नियमाप्रमाणे भाडे आकारणी सुरू झाल्यास प्रवासी आणि चालक यांच्यातील वाद कमी होऊन विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.


