पनवेल महापालिका: ५१७ कोटींची तिजोरी भरली, तरीही १७८७ कोटींच्या वसुलीची प्रतीक्षा

पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराचा प्रश्न सुटण्यासाठी मागील वर्षी जुलै महिन्यात जाहीर केलेल्या शास्ती सवलतीच्या अभय योजनेनंतरही यंदाच्या आर्थिक वर्षात पनवेल महापालिकेसमोर १७८७ कोटी रूपयांचा मालमत्ता कर वसुलीचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे पनवेलच्या मतदारांनी नूकत्याच निवडूण दिलेल्या सत्ताधारी नगरसेवकांना करदात्यांसोबत समन्वय साधून याविषयी मार्ग काढावा लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात ३,६०,४६२ करदाते आहेत. यापैकी २,०१,७३६ करदात्यांनी कर भरलाच नाही. त्यामुळे निम्यापेक्षा अधिक करदात्यांचे कर भऱण्यासाठी मन परिवर्तनासाठी महापालिका प्रशासनाला झटावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील इतर महापालिकेत कर वसुलीत दिरंगाई करणा-यांवर कर्मचा-यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई केली होती.मात्र पनवेलचे आयुक्त कर वसुलीत दिरंगाई करणा-यांवर काय कारवाई करणार याकडे प्रामाणिक कराचा भरणा-या करदात्यांचे लक्ष्य लागले आहे. महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रशासक काळात जुलै ते डिसेंबर या महिन्यात मालमत्ता करामध्ये करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी शास्ती सवलतीची अभय योजना जाहीर केली. या योजनेनंतर ५१७.०८ कोटी रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. मात्र अजूनही खारघर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कोट्यावधी रूपये करदात्यांनी थकीत ठेवले आहेत.
मागील वर्षी २३३० कोटी रूपयांची एकुण मालमत्ता कराची वसुली होती. यापैकी सवलतीच्या रकमेसह एकुण वसूली ६६० कोटी रूपये झाली. मात्र अजूनही १७८७ कोटी रूपये वसूलीसाठी मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिका प्रशासन आणि सभागृहातील सत्ताधारी पदाधिका-यांना पनवेलकरांनी थकीत कर का भरावा हे पटवून द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांनी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये भारतीय जनता पक्षाने पनवेलकरांना दिलेल्या आश्वासनपत्रात मालमत्ता करांचे दर वाढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने महापालिकेला पुढील आर्थिक वर्षात कराच्या दरात वाढ करण्यामध्ये मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे थकीत करवसूलीवर महापालिकेला त्यांचे आर्थिक आराखडे उभारावे लागणार आहेत. या दरम्यान पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी जोरदार आखणी सुरू केली आहे. महापालिकेच्या कर विभागात प्रभाग निहाय कर्मचारी व अधिका-यांची पथके स्थापन करून थकीत कर ठेवणा-या करदात्यांच्या मालमत्तांपर्यंत महापालिका पोहचणार आहे. ११ मार्चपर्यंत महापालिकेचे कर विभाग करदात्यांना वर्तमान पत्रामध्ये थकीत कर भरण्याचे आवाहन करेल. त्यानंतरही मोठी रक्कम थकविणा-या करदात्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा महापालिकेचे नियोजन आहे.



