‘एफडीए’कडून डोमिनोझ पिझ्झाच्या ४ आउटलेट्सचे परवाने निलंबित
परदेशी ब्रँड्सनाही 'एफडीए'चा दणका, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत त्रुटी?

मुंबई : अन्न व औषध प्रशासनानं स्वच्छतेचे नियम न पाळल्यामुळे जगप्रसिद्ध ‘डोमिनोज पिझ्झा’वर कारवाई केलीय. नियमांची पायमल्ली केल्याबद्दल FDA नं डोमिनोजच्या राज्यातील ४ दुकानांवर कारवाई करत त्यांना तत्काळ कामबंद करण्याची नोटीस बजावलीय. यामध्ये मुंबईतील ३ तर साताऱ्यातील कराडवळच्या एका आस्थापनेचा समावेश आहे. एफडीएनं ११ ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यभरातील मॅकडॉनल्ड्स, केएफसी, बर्गर किंग, सब वे, स्टारबक्स, पिझ्झा हट, मॉंजिनिझ आणि डॉमिनोजसारख्या एकूण १०४ खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकून ही कारवाई केलीय. डोमिनोजच्या मुंबईतील तीन आस्थापनांना FDA कडून टाळ – एफडीएनं अचानक केलेल्या या कारवाईत तिथं कमालीची अस्वच्छता आणि कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. सर्वात मोठी बाब म्हणजे या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मचा आणि ओव्हनचा वापर केला जात असल्याचं तपासणीत समोर आलंय. तसेच तळण्याकरिता वापरण्यात येणारं खाद्यतेल हे एक्सपायरी डेट टळून गेलेलं असल्याचं निदर्शनास आल्यानं एफडीएकडून या तीन ठिकाणचा खाद्य परवाना तत्काळ रद्द करण्यात आलाय. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुंबईतील तीन डॉमिनोज आऊटलेट्सचे परवाने एफडीएनं निलंबित केले आहेत.
सुधारणा नोटीसमधील सर्व त्रुटींची पूर्तता करून एफडीएची पुन्हा मंजुरी मिळेपर्यंत या तिन्ही आऊटलेट्सना विक्री अथवा उत्पादन करता येणार नाही, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. अन्न साठवणूक आणि तापमान नियंत्रणाबाबतच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर धडक कारवाई करणाऱ्या एफडीएच्या रडारवर आता बडे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आल्याचं चित्र आहे. आपल्या कठोर कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सध्या एफडीएची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत डोमिनोजसह इतरही अनेक नामांकित फूड ब्रँड्सच्या एकूण १०४ आस्थापनांची तपासणी केली. यात नियम मोडणाऱ्या ९५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या असून, गंभीर त्रुटींमुळे काहींचे परवाने निलंबित करण्यात आलेत. अन्न सुरक्षा मानके विनिमय, २०११ मधील अनुच्छेद ४ मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याबद्दलही कारवाई करण्यात आल्याचं एफडीएकडून स्पष्ट करण्यात आलंय.
१) विलेपार्ले (पश्चिम) : एस. व्ही. रोड आणि डी. जे. रोडच्या कोपऱ्यावरील दुकान
२) बोरिवली (पश्चिम) : आय. सी. कॉलनी, सेंट फ्रान्सिस स्कूल ग्राऊंडसमोर, ‘द कॅसल’ इमारतीतील दुकान
३) घाटकोपर (पश्चिम) : आर-सिटी मॉल (R-City Mall), तिसरा मजला, ए-विंग दुकान



