क्रिडाविश्व

हॉकी विश्वचषकाला १५ ऑगस्टपासून सुरुवात; भारताची इंग्लंड, पाकिस्तानशी लढत

मुंबई : पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेला १५ ऑगस्टपासून नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये सुरुवात होणार आहे. ३० ऑगस्टपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी १६ संघ सहभागी होणार आहेत. यंदाच्या विश्वचषकाच्या स्पर्धा स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, उपांत्यपूर्व फेरी रद्द करण्यात आली आहे. पुरुषांच्या स्पर्धेत १६ संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात चार संघ आहेत. भारताला ‘पूल डी’मध्ये इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्ससोबत स्थान देण्यात आले आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्टला इंग्लंड आणि १९ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध भारताची लढत होईल. यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत मोठा बदल म्हणजे उपांत्यपूर्व फेरीऐवजी नव्या पद्धतीचा दुसरा गट टप्पा असेल. पहिल्या चार गटांमधील अव्वल दोन संघ असे एकूण आठ संघ पुढील टप्प्यात प्रवेश करतील. या आठ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे सुरुवातीच्या गटातील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनीही पहिल्या टप्प्यात अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील टप्प्यात प्रवेश करणाऱ्या संघांविरुद्ध मिळवलेले निकालही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीचे सामने २८ आणि २९ ऑगस्ट रोजी होणार असून, कांस्यपदकाचा सामना ३० ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता, तर अंतिम सामना रात्री ८ वाजता होईल. भारतीय पुरुष संघाने १९७१ मध्ये झालेल्या पहिल्या हॉकी विश्वचषकापासून स्पर्धेत सहभाग घेतला आहे. भारताने आतापर्यंत १५ वेळा विश्वचषकात भाग घेतला असून, १९७५ मध्ये पाकिस्तानचा पराभव करत एकमेव विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे.

महिला हॉकी विश्वचषकातही १६ संघ चार गटांत विभागले आहेत. भारताला चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत ‘गट ड’मध्ये स्थान मिळाले आहे. भारतीय महिला संघ १६ ऑगस्टला चीनविरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर १८ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका आणि २० ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध सामना होईल. महिला विश्वचषकाचा अंतिम सामना २९ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. भारतीय महिला संघाने १९७४ मध्ये प्रथम विश्वचषकात सहभाग घेतला. २०२६च्या स्पर्धेसह संघाने नऊ वेळा विश्वचषक खेळला आहे. मात्र, महिला संघाला अद्याप विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button