महाराष्ट्र

रेल्वे रुळांवर स्टंटबाजी करणाऱ्यांना मध्य रेल्वेचा इशारा; कठोर कारवाईचा इशारा

पुणे : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये, फूटबोर्डवर, गाडीच्या छतावर तसेच रेल्वे रुळांवर जीवघेणे स्टंट करून त्याचे रील्स आणि व्हिडीओ बनविणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने कठोर भूमिका घेतली आहे. अशा धोकादायक कृती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. सोशल मीडियावर लाईक्स आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात काही तरुणांकडून धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये स्टंट करण्याचे प्रकार केले जातात. फूटबोर्डवर उभे राहणे, रेल्वेच्या छतावर चढणे, रुळांवर उभे राहून व्हिडीओ तयार करणे यांसारख्या कृती अत्यंत धोकादायक आहेत. अशा प्रकारांमुळे केवळ संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात येत नाही, तर इतर प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १५४, १४५ आणि १५६ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये संबंधिताला नोटीस बजावून थेट रेल्वे न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले जातील. न्यायालयात खटला चालवून दोषी आढळणाऱ्यांना मोठा दंड तसेच अटकेच्या कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या छतावर किंवा फूटबोर्डवर स्टंट करताना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा धक्का लागणे, चालत्या गाडीतून खाली पडणे किंवा अन्य रेल्वेची धडक बसणे यांसारख्या गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा घटनांमध्ये जीवितहानी होऊ शकते. शिवाय, या स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने इतर तरुणांनाही त्याचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे अधिक लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

अशा प्रकारची धोकादायक घटना किंवा स्टंटबाजी निदर्शनास आल्यास प्रवाशांनी तत्काळ आरपीएफच्या १३९ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच स्टेशनवरील अधिकारी किंवा जीआरपी कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी. सुरक्षित प्रवास करा आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रवास करा,” असे आवाहन मध्य रेल्वेचे हेमंतकुमार बेहेरा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button