साईचरणी २१ लाखांचे सोन्याचे बिस्किट अर्पण; प्रसादालयासाठी ७० लाखांचे डिशवॉशर मशीन
शिर्डी : साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असून, भाविकांकडून साईचरणी रोख रक्कम, सोने-चांदी तसेच विविध वस्तूंच्या स्वरूपात दान अर्पण केले जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत साईचरणी भक्ती आणि दानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. बंगळुरू येथील एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी मौल्यवान सोन्याचे दान केले. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने साई प्रसादालयासाठी अत्याधुनिक डिशवॉशर मशीन देण्यात आले. बंगळुरू येथील एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी २१ लाख ९ हजार ६९१ रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट अर्पण केले. या सुवर्णदानाचे एकूण वजन १३६ ग्रॅम ७०० मिलिग्रॅम आहे. यामध्ये १०० ग्रॅम, १० ग्रॅम, ५ ग्रॅम आणि २ ग्रॅम वजनाच्या बिस्किटांसह नाण्यांचाही समावेश आहे. साईबाबांच्या चरणी अशा प्रकारे विविध वजनांची सोन्याची बिस्किटे प्रथमच अर्पण करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. दानशूर भाविकाच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. देणगी स्वीकारल्यानंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाविकाचा यथोचित सत्कार केला.
सुवर्णदानासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा प्रसादालयासाठी परदेशी बनावटीचे अत्याधुनिक डिशवॉशर मशीन देणगी म्हणून देण्यात आले. या मशीनची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. साईबाबा प्रसादालयात दररोज सुमारे ४५ ते ५० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. नव्या डिशवॉशर मशीनच्या माध्यमातून तासाला जवळपास ४ ते ५ हजार भांडी अत्यंत स्वच्छ, जलद आणि निर्जंतुक पद्धतीने धुतली जाणार आहेत. त्यामुळे संस्थानच्या स्वच्छता मोहिमेला तसेच भाविकांच्या सेवेला मोठी गती मिळणार असल्याचे गाडीलकर यांनी सांगितले. सुवर्णदान करणाऱ्या बंगळुरूच्या साईभक्तासह ७० लाख रुपयांचे डिशवॉशर मशीन देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संस्थानच्या वतीने मनापासून आभार मानले.



