गुन्हेमहाराष्ट्र

भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १३ जणांना अटक

मुंबई :  समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचा जेसीबी आणि ८० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशोक नगर क्रॉस रोड क्रमांक ४, कांदिवली पूर्व येथे भूमिगत असलेल्या एमटीएनएल कंपनीच्या १५३ मीटर लांबीच्या २००० पेअरच्या चार केबल २२ जून २०२६ रोजी चोरीस गेल्या होत्या. या केबलची अंदाजे किंमत ९ लाख ५०० रुपये होती. याप्रकरणी एमटीएनएलचे मॅनेजर वीरेंद्र ललताप्रसाद यादव यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत स्वप्निल अनिल शेलार, सुरेश शिवाजी शिंदे, प्रथमेश दत्तात्रे मालवणकर, सागर नैशिल कांबळे, साहिल शकिल साह, अब्दुल सिध्दीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलीक, मो. अफजल हसन खान, सुरज उर्फ साहिल दिलावर कालेकर, मनोजकुमार शहब्दिन गुप्ता, मुबारक अली नबीजान अली शहा, आझम अब्दुल गफार खान आणि अब्दुल वहाब सादिक मिया अन्सारी अशा १३ जणांना अटक केली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेला २० लाख रुपये किमतीचा जेसीबी तसेच ८० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजितसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, सहायक फौजदार रोजश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी व अतुल ननावरे, तसेच पोलीस शिपाई दौलत साळुंके आणि निलेश भिकले यांच्या पथकाने केली. ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, उत्तर परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि समतानगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button