पुणे पुन्हा हादरलं! १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलिसांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पिंपळवंडी येथील रहिवासी योगेश पवार यांची इयत्ता चौथीत शिकणारी दहा वर्षांची मुलगी आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारच्या सुमारास पालक घराबाहेर असताना आरोपीने संधी साधून चिमुकलीवर अत्याचार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह लपविल्याचे तपासात समोर आले. मुलगी घरात दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यामुळे आळेफाटा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. दरम्यान, संशयित आरोपीही पोलिसांच्या शोधमोहीमेत सहभागी होत होता. मात्र, त्याच्या हालचाली आणि जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याजवळ झाडाशेजारी चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत असून, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून गुन्ह्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



