रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; उद्यापासून राज्यभर कडक कारवाई
नोटिशीनंतर ३० दिवसांची मुदत; त्यानंतर बॅच तीन महिने निलंबित, तरीही मराठी न आल्यास परवाना रद्द

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले असून, या नियमाची कडक अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून, आता नियमांची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नाही किंवा मराठीचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नाही, अशा चालकांना आरटीओ प्रशासनाकडून प्रथम रीतसर नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित चालकाला मराठी भाषा शिकण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीनंतरही चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले नाही किंवा तो मराठी भाषेत संवाद साधू शकला नाही, तर त्याचा बॅच तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. तीन महिन्यांच्या निलंबनाच्या कालावधीतही चालकाने मराठी भाषा शिकली नाही, तर संबंधित चालकाचा बॅच आणि परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.
राज्यात आतापर्यंत सुमारे नऊ लाखांच्या आसपास रिक्षा व टॅक्सी परवाने आणि बॅचचे वाटप करण्यात आले आहे. परवाना देतानाच आरटीओ अधिकाऱ्यांनी चालकाच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी केली असती, तर आज कठोर कारवाईची वेळ आली नसती, असे सरनाईक यांनी नमूद केले. यापुढे नवीन बॅच किंवा परवाना देताना चालकाच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची कसून तपासणी करण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या तपासणी प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. तसेच चालकाचे डोमिसाईल अर्थात अधिवास प्रमाणपत्रही काटेकोरपणे तपासण्यात येणार आहे.
मराठी भाषेचा सन्मान राखण्याबरोबरच प्रवाशांना चालकांशी संवाद साधताना अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून राज्यभर या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.



