देशविदेशभारत

मोदी मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय; १३ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

बिहारमध्ये चारपदरी महामार्ग; चार महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने पाच मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. एकूण १३ हजार ४१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये बिहारमधील चारपदरी महामार्गासह पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील चार महत्त्वाच्या रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणाचा समावेश आहे. केंद्रीय रेल्वे व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळाने मुझफ्फरपूर-सीतामढी-सोनवर्षा या ८२.६ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे चारपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ३,५९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग बिहारला भारत-नेपाळ सीमेच्या जवळील भागाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने व्यापार, वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

हावडा-चेन्नई मार्गाला बळकटी – देशातील प्रमुख रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या हावडा-चेन्नई ट्रंक रूटचे विस्तारीकरण करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशादरम्यानच्या खरगपूर-भद्रक या १७३ किलोमीटर मार्गासाठी ३,३५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत ४१ मोठे आणि १६९ छोटे पूल उभारले जाणार आहेत. याशिवाय भद्रक-हरिदासपूर या ७५ किलोमीटरच्या चौथ्या रेल्वे मार्गासाठी १,५३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या विस्तारीकरणामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

आंध्र प्रदेश-तामिळनाडूतही रेल्वे विस्तार – गुम्मिडीपुंडी-गुदूर या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवरील सुमारे ९० किलोमीटर रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन उभारण्यासाठी २,२२९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर ओडिशातील पारादीप बंदर-कटक मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पांमुळे रेल्वे मार्गांची क्षमता वाढण्यासोबतच मालवाहतूक अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे. बंदरे, औद्योगिक क्षेत्रे आणि प्रमुख शहरांना रेल्वेने जोडल्याने लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच बांधकामाच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, दीर्घकालीन दृष्टीने देशाच्या आर्थिक विकासालाही या प्रकल्पांचा फायदा होईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button