देशविदेशभारत

ग्राहकाला मोठा दिलासा! E20 पेट्रोल प्रकरणात कंपनीला नवी कार देण्याचा आदेश

वृत्तसंस्था : देशभरात E20 इंधनाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. E20 पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याचा दावा ग्राहकाने केला हा दावा मान्य करत आयोगाने वाहन कंपनीला नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. E20 इंधनाशी संबंधित अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. तक्रारदाराने प्रसिद्ध वाहन उत्पादक मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, E20 पेट्रोल वापरण्यास सुरुवात केल्यानंतर कारच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होऊ लागला. इंजिनची कार्यक्षमता कमी झाली, मिसफायरिंगची समस्या निर्माण झाली आणि वाहनाचे मायलेजही घटले.

तक्रारदाराने अनेक वेळा अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये कार दुरुस्तीसाठी दिली. मात्र काही दिवसांत पुन्हा गाडीत बिघाड होत होता. याचा मोठा आर्थिक फटका बसल्याचे ग्राहकाने आयोगासमोर सांगितले. दुसरीकडे, वाहन कंपनी आणि डीलरने आयोगासमोर दावा केला की संबंधित कार मॉडेल E20 इंधनासाठी पूर्णपणे सक्षम आहे. वाहनातील बिघाड हा चुकीच्या देखभालीमुळे किंवा नियमित झिजेमुळे झाला असून त्याचा E20 इंधनाशी संबंध नसल्याचे कंपनीचे म्हणणे होते. मात्र तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये वाहनाच्या इंजिनमध्ये E20 इंधनाचे अवशेष साचल्याचे, तसेच पेट्रोल टाकीत पांढऱ्या रंगाचे चिकट द्रव आढळल्याचे नमूद करण्यात आले. वाहनाची अनेकदा दुरुस्ती करूनही समस्या कायम असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे तपासल्यानंतर ग्राहक आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला. आयोगाने मारुती सुझुकीला ४५ दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची E20 इंधनाशी सुसंगत नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. जर कंपनीने निर्धारित कालावधीत नवीन वाहन उपलब्ध करून दिले नाही, तर कारची संपूर्ण किंमत म्हणजेच २०.५० लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. याशिवाय, तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासासाठी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि न्यायालयीन खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे E20 इंधनाशी संबंधित वाहनांच्या कार्यक्षमतेबाबत सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button