भारतमहाराष्ट्र

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

मुंबई : भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, डिसेंबर २०२६ पर्यंत अनेक राष्ट्रीय महामार्गांवर पारंपरिक टोल बॅरियर्स हटवून अडथळामुक्त टोल प्रणाली लागू करण्याचे नियोजन आहे.

या नव्या प्रणालीमुळे वाहनांना थांबण्याची गरज भासणार नाही, कारण हायटेक कॅमेरे आणि AI तंत्रज्ञानाद्वारे टोल आपोआप वसूल केला जाईल. यामुळे टोल प्लाझांवरील गर्दी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या प्रणालीत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR), FASTag आणि सॅटेलाइट-आधारित GNSS तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हाय-स्पीड कॅमेरे वाहनांची नंबर प्लेट ओळखून टोल आपोआप कापतील, तर जीपीएसद्वारे वाहनाने केलेल्या प्रवासाच्या अंतरानुसार शुल्क आकारले जाईल. यामुळे ‘जितका प्रवास तितकाच टोल’ हा नियम लागू होईल. तसेच, AI प्रणाली रिअल-टाइम ट्रॅफिकवर लक्ष ठेवून गर्दीची माहिती वाहनचालकांना देईल आणि चुकीचे टॅग किंवा फसवणूक रोखण्यासाठी वाहनाचा प्रकारही ओळखेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-नोटीस पाठवली जाईल. या बदलामुळे देशातील लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास मदत होईल आणि भारताच्या वाहतूक व्यवस्थेला जागतिक दर्जा मिळेल, असेही गडकरी यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button