डोंबिवलीत जागतिक पुस्तक दिनी ७५ हजार पुस्तकांचे प्रदर्शन; ९ हजार वाचकांनी दिली भेट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर रविवारी ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पै फ्रेन्डस लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि मुंबई परिसरातील सुमारे नऊ हजार वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध प्रकारच्या पुस्तकांच्या या अनोख्या रस्त्यावर भरवलेल्या प्रदर्शनातून वाचकांना आपल्या आवडीची पुस्तके निवडून खरेदी करण्याची संधी मिळाली. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे उष्णतेतही नागरिकांना आरामात पुस्तके पाहता आली.
या उपक्रमासाठी सुमारे २५० स्वयंसेवकांनी मध्यरात्रीपासून फडके रस्ता आणि नेहरू रस्त्याच्या परिसरात ७५ हजारांहून अधिक पुस्तके मांडण्याचे काम केले. वाहतुकीसाठी रस्ता बंद करून वाचकांना मोकळ्या वातावरणात पुस्तकांचा आनंद घेता यावा याची विशेष काळजी घेण्यात आली. बुक स्ट्रीट सुरू होण्यापूर्वीच अनेक वाचक रांगेत उभे होते, ज्यामुळे उपक्रमाची लोकप्रियता दिसून आली. विशेष म्हणजे, प्रत्येक सहभागी वाचकाला एक पुस्तक मोफत देण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


