महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये १ मे पासून डिजिटल जनगणना; ‘या’ पोर्टलवर नोंदवा स्वतःची माहिती

विरार : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणनेअंतर्गत नागरिकांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरायची आहे. यासाठी एकूण ३४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. २०११ नंतर तब्बल १४ वर्षांनी देशातील १६वी जनगणना पार पडणार आहे. देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना असून तिला जनगणना २०२७ आहे संबोधण्यात येत आहे. ही जनगणना एकूण दोन टप्प्यात पार पडणार असून वर्ष २०२६ मध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी गटानुसार व घरगणना माहिती संकलित केली जाणार असून, वर्ष २०२७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना व नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील स्वगणनेसाठी ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ हा कालावधी देण्यात आला. या कालावधीत नागरिकांना स्वगणना अंतर्गत स्वतःची माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. स्वगणना करताना नागरिकांना एकूण ३४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यात घरांची स्थिती, कुटुंबाची माहिती तसेच कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी यावर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करून माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होईल, जो जपून ठेवून नागरिकांनी संबंधित प्रगणकास सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना नोंदणी प्रक्रिया राबविली जाईल. या काळात नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील. जनगणनेसाठी वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण ०१ मास्टर ट्रेनर, ९१ क्षेत्रीय प्रशिक्षक, ६५१ पर्यवेक्षक व ४२९८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून जणगणनेबाबतचे आवश्यक प्रशिक्षण संबंधितांना टप्प्याटप्प्याने देण्यात येत असल्याची माहिती उप-आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी हर्षला राणे यांनी दिली आहे.

या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे :
१. घरांची स्थिती : इमारत क्रमांक
(नगरपालिका/स्थानिक संस्था अथवा गणना क्रमांक), गणना घर क्रमांक, गणना घराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या भिंतींसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणनाघराच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा, गणना घराची स्थिती, कुटुंब क्रमांक.
२. कुटुंबाची माहिती : कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, कुटुंबप्रमुखाचे लिंग, जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास, गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती, केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या, या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या.
३. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी : पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचा प्रकार, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी /पीएनजी जोडणी, वापरण्यात येणारे मुख्य इंधन. इ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button