भाईंदर सरकारी रुग्णालयात कोट्यवधींची मुदतबाह्य औषधे; प्रशासन सतर्कतेमुळे अनर्थ टळला
देणगीत मिळालेल्या औषधांवर संशय; संबंधित संस्थेविरोधात कारवाईचे आदेश

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय येथे तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदतबाह्य औषधांचा साठा आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही औषधे एका सामाजिक संस्थेकडून देणगी म्हणून प्राप्त झाली होती. २७ मार्च रोजी ‘सक्षम फाउंडेशन’मार्फत मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा रुग्णालयाला देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने नियमित तपासणी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. अनेक औषधांची मुदत केवळ काही दिवसांत संपणार होती, तर काही औषधे आधीच एक्सपायर झाली होती. रुग्णालय प्रशासनाने वेळीच दक्षता घेत या औषधांचे वितरण थांबवले, त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. रुग्णालयाचे व्यवस्थापक जाफर तडवी यांनी तातडीने संबंधित संस्थेविरोधात लेखी तक्रार दाखल करत राज्य शासनालाही या प्रकाराची माहिती दिली.
या घटनेची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक करत संबंधित संस्थेविरुद्ध रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाची कमतरता आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुमारे २०० खाटांचे हे रुग्णालय परिसरातील महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे कशी स्वीकारली गेली, तपासणीची जबाबदारी नेमकी कोणाची होती आणि सामाजिक संस्थांची पडताळणी कितपत काटेकोरपणे केली जाते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पोलीस व प्रशासकीय चौकशी लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.



