महाराष्ट्र

ठाण्याची ओळख हरवली! पुनर्विकासाच्या फेऱ्यात मामलेदार मिसळच्या जुन्या वास्तूवर फिरला हातोडा

ठाणे : ठाणेकरांच्या चवीवर अधिराज्य गाजवणारी आणि शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरलेली मामलेदार मिसळ ची जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासासाठी परिसर मोकळा करताना हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले, त्यामुळे अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत. १९५० च्या दशकात एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेली ही मिसळ पुढे ठाण्याची ओळख बनली. तहसील कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ‘मामलेदार मिसळ’ हे नाव प्रचलित झाले आणि पुढे त्याच नावाने हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. झणझणीत कट, खास मसालेदार चव आणि घरगुती पद्धतीमुळे या मिसळीने रसिकांच्या जिभेवर वेगळे स्थान निर्माण केले. अगदी लहानशा जागेत असलेले हे दुकान सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दीने फुललेले असायचे, आणि मिसळीसाठी लागणाऱ्या रांगा हेच त्याचे वैशिष्ट्य होते.

या ठिकाणी अनेक नामांकित व्यक्तींनीही भेट देत मिसळीचा आस्वाद घेतला होता. बाळ ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांसारख्या दिग्गजांनी येथे हजेरी लावल्यामुळे या ठिकाणाची लोकप्रियता आणखी वाढली होती. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि बाहेरगावचे पर्यटकही या मिसळीचा अनुभव घेण्यासाठी येथे आवर्जून येत असत. दरम्यान, तहसील कार्यालय, ठाणेनगर पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आल्याने हे दुकानही हटवावे लागले. सध्या मामलेदार मिसळ दुसऱ्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आले असले, तरी जुनी वास्तू आणि तिच्याशी निगडित आठवणी मात्र कायमच्या मागे पडल्या आहेत. भविष्यात नव्या इमारतींसह आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, मात्र त्या जुन्या जागेतील चव, गप्पा आणि वातावरण पुन्हा अनुभवायला मिळेल का, हा प्रश्न ठाणेकरांच्या मनात कायम राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button