राजकारण

राऊतांचा गंभीर आरोप; “शिवसेना” हे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी झाला दोन हजार कोटींचा सौदा

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिंधे गटाला दिलं. मात्र यामागे मोठे षडयंत्र असून चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले असल्याची खात्रीलायक माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हा प्राथमिक आकडा असून हे १०० टक्के सत्य आहे. असे राऊतांनी सांगितले तसेच यापुढे लवकरच बऱ्याच गोष्टी उघड होतील. अशी माहिती राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

याबद्दल माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले की, जो पक्ष आणि जो नेता अगदी शाखाप्रमुख आणि नगरसेवक विकत घेण्यासाठी ५० लाख, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो. त्या पक्षाने शिवसेना हे नाव विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा केला असेल? याचा हिशेब करण्यासाठी १०० ऑडिटर बसवावे लागतील. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे विकत घेतलं गेलं आहे. यासाठी आत्तापर्यंत दोन हजार कोटी खर्च झालेला आहे. ही माहिती त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डरांनी मला दिली आहे. यापुढे अशा अनेक गोष्टी विकत घेण्याची त्यांची तयारी सुरु आहे. उद्या हे मुंबई आणि महाराष्ट्र देखील विकत घेतील.

‘हिंडेनबर्ग’नंतर आता ‘टीम जॉर्ज’चा अहवाल आला आहे. २०१४ पासून निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम हॅक करण्यात आले. विरोधकांना बदनाम करण्यासाठी इस्रायली कंपनीची मदत घेण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे. सरकारने यावर उत्तर दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे सरकारने हिंडेनबर्गच्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही त्याचप्रमाणे टीम जॉर्जच्या अहवालावर देखील उत्तर दिलं जाणार नाही. २०१४ पासून प्रत्येक निवडणूक हेराफेरी करून जिंकण्यात आली आहे. यावर सरकारने उत्तर द्यावं. अशी मागणी राऊत यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘पेगॅससच्या बाबतीत देखील आम्ही प्रश्न विचारले होते. मात्र त्यावेळी देखील ते सर्वोच्च न्यायालयातून क्लीन चिट घेऊन आले. क्लीन चिट देणाऱ्या न्यायमूर्तींवर सरकार कशाप्रकारे मेहेरबान होतं आपण पाहिलं असेलच. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय क्लीन चिटचा कारखाना बनला आहे. हिंडेनबर्गच्या प्रकरणावर सरकार गप्प आहे. पंतप्रधान आपल्या मित्रासाठी काय काय करत आहेत. इस्रायली कंपनीला ठेका देणारा पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून देशात सतत सत्तेत येत आहे. राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी या इस्रायली कंपनीची मदत घेतली जात आहे. या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे.

आजही हजारो काश्मिरी पंडित हे काश्मीर खोऱ्यातून जम्मूला येऊन का थांबले आहेत ? त्यांच्या हत्या का झाल्या ? आपण त्यांना संरक्षण देऊ शकलात का? याचं उत्तर द्या. आजही काश्मिरी पंडित त्यांची घरी जायला तयार नाहीत, हे कोणाचं अपयश आहे. आजही जम्मूच्या रस्त्यावर शेकडो काश्मिरी पंडित न्याय मागत आहेत. हे देशाचे गृहमंत्री अमित शहांना माहित नसल्यास त्यांनी गृहमंत्री पदावर राहू नये. अशी टीका राऊत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button