कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर बारावी परीक्षा कामाची जबाबदारी

बारावी परीक्षांवर शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या संपाचे सावट पसरले आहे. राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून संपामुळे बारावी परीक्षेशी संबंधित कोणतेही काम न करण्याच्या निर्णयावर शिक्षकेतर कर्मचारी ठाम आहेत.
त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱया बारावी परीक्षांच्या आयोजनात प्राचार्य आणि शिक्षकांची कसोटी लागली आहे. अनेक महाविद्यालयांनी कंत्राटी तत्त्वावरील शिक्षकेतर कर्मचाऱयांवर परीक्षा कामकाजाची जबाबदारी सोपविली आहे. परीक्षा काळात कंत्राटी कामगारांना सुट्टय़ा न घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार इतिवृत्त न निघाल्याने संयुक्त कृती समितीने बेमुदत संप करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या संपाचा फटका राज्यातील बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना बसण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुंबईतील बहुसंख्य कॉलेजमधील १०० टक्के शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील सर्वच अशैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत. बऱयाच महाविद्यालयांत परीक्षेच्या कामकाजात कंत्राटी कर्मचाऱयांची मदत घेतली जात आहे. सोमवारी संपाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी संप करणाऱया कर्मचाऱयांना पोलिसांकडून समज देण्यात आली. उद्या परीक्षेच्या वेळेत संपकरी कर्मचाऱयांनी कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करून गोंधळ करू नये, अशा सूचना पोलिसांमार्फत देण्यात आल्या आहेत.
बारावीच्या परीक्षांना संपाचा फटका नाही
शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या संपाचा बारावीच्या परीक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही. पर्यवेक्षक, केंद्रसंचालक ही कामे शिक्षकांची आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱयांचा फारसा संबंध येत नाही. प्राचार्यांसोबतच्या बैठकीत आम्ही गरज भासल्यास शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्यास कोणतीही अडचण येणार नसून परीक्षा सुरळीत पार पडतील. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
परीक्षांना झळ बसल्यास सरकारच जबाबदार
बेमुदत संपाविषयी राज्य सरकारला आम्ही आधीच नोटीस दिली होती. याशिवाय वेळोवेळी इशारा आंदोलनही केले होते. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. संपाची झळ बारावीच्या विद्यार्थ्यांना बसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे. आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाल्यास आम्हाला संप सुरू ठेवण्याची गरजच काय? – अजय देशमुख, राज्य संघटक, राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती
बोर्ड परीक्षांच्या या कामकाजावर परिणाम होणार ?
– विषयानुसार प्रत्येक दिवशी बैठक व्यवस्था बदलत असते. पेस्टिंग करण्याचे काम शिक्षकेतर कर्मचाऱयांचे आहे.
– मुख्य परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची सीलंबद पाकिटे घेण्यात शिक्षकांसोबत दोन शिक्षकेतर कर्मचारी जातात.
– किती प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या याची नोंद ठेवण्याचे काम.
– परीक्षेदरम्यान इशारा घंटा देणे.
– परीक्षागृहात पिण्याच्या पाण्याची सोय.
– परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका केंद्रप्रमुखांसोबत मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचविणे.


