हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्ट्रिक

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आपली जुनी परंपरा तोडली. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला. दिल्लीचे १०६ धावांचे आव्हान मुंबईने १५ षटकात पार करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. मुंबईकडून यस्तिका भाटियाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स महिला संघाने लीग स्टेजमधील आपले पहिले तीनही सामने जिंकून गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले.
मुंबई इंडियन्सचा पुरूषांचा संघ हा कायम सुरूवातीला हरतो आणि शेवटी सलग विजय मिळवत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवतो. मात्र महिला संघाने याच्या बरोबर उलटे केले. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या १०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी मुंबईला पॉवर प्लेमध्ये ४७ धावांपर्यंत पोहचवले. सेट झालेल्या यस्तिका भाटियाने आक्रमक फटकेबाजी करत ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. मुंबई देखील ९ व्या षटकात ६५ धावांवर पोहचली होती.
मात्र यस्तिका भाटिया बाद झाली अन् मुंबईची धावगती मंदावली. त्यातच हेली मॅथ्यू ३१ चेंडूत ३२ धावा करून बाद झाली. यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दिल्ली कॅपिटल्सने टिच्चून मारा आणि उत्कृष्टी फिल्डिंग करत मुंबईचा विजय अवघड करण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमन आणि ब्रंटने १५ व्या षटकात मुंबईला विजय मिळवून देत WPL 2023 मधील विजयाची आपली हॅट्ट्रिक पूर्ण केले.
तत्पूर्वी, अव्वल स्थानासाठी होत असलेल्या मुंबई – दिल्ली सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने १०५ धावात गुंडाळत सामन्यावर पकड निर्माण केली. मुंबईने पॉवप्लेमध्येच टिच्चून मारा करत दिल्लीला थोपवले. मुंबईकडून सैका इशाकने १३ धावात ३, इसी वँगने १० धावात ३ आणि हेली मॅथ्यूजने १९ धावात ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक ४३ तर जेमिमाह रॉड्रिग्ज तर २५ धावा केल्या



