महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यात एक हजार ८५२ बालके कुपोषित

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या जवळपास एक हजार ८५२ इतकी आहे. त्यामुळे कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन कामास सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. रूपाली सातपुते यांनी व्यक्त केले.

महिला व बालविकास विभाग आणि आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने अन्नसाखळी व्यवस्थापन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. गर्भवतींना दिला जाणारा आहार, गृहभेट, पौष्टिक आहार कोणता असावा, अशा अनेक विषयांवर चर्चा करून कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांची तपासणी करून पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानुसार व महिला व बाल विकास विभाग व आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने अन्नसाखळी व्यवस्थापन कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. रूपल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बाळ जन्माला आल्यापासून त्याला दिलेला आहार असेल व ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी मार्गदर्शन असेल असे प्रशिक्षण घेऊन आपल्याला सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे प्रतिपादन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते यांनी केले. महिला व बालविकास विभाग अधिकारी संजय बागुल यांनी सांगितले की, कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी विस्तार अधिकारी, चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, पर्यवेक्षिका व आयआयटी बॉम्बेद्वारे समन्वय साधून प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. यावेळी आरोग्य विभागातील प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी स्वाती पाटील, वैद्यकीय अधिकारी अंजली चौधरी, महिला व बालविकास विभागातील विस्तार अधिकारी, चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफीसर व पर्यवेक्षिका उपस्थित होते. कार्यशाळेत सॅम मॅम बालकांची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार व आरोग्य काळजी या संदर्भातील माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button