महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे मानधन रखडले

मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यातील दोन लाख तर ठाणे जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे मानधनापासून वंचित राहावे लागले असल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळे शासनाने मानधनाची रक्कम त्वरीत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून अंगणवाडीचा गाडा हाकला जात आहे. तसेच याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गर्भवती व स्तनदा मातांसह ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार देणे आदी कामे केली जातात. कोरोना आजाराच्या प्रसार वाढू नये म्हणून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महानगरपालिका व गावा गावात सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करण्याची जवाबदारी चोख पार पाडली. असे असताना, देखील अनेकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन रखडण्याचे प्रकार वांरवार घडत आहेत.
अंगणवाडी सेविकांना ८ हजार ५०० तर मदतनीसांना ४ हजार २५० इतके तुटपुंजे मानधन दिले जाते. हे मानधन दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत मिळत असते. या मानधनातून या सेविका व मदतनीस आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत. तर काही कर्मचारी तर पूर्णत: या मानधनावर अवलंबून आहेत. या मानधनावरच त्यांचे घर चालत असते, अशा परिस्थितीत मानधन न मिळाल्यास त्यांची आर्थिक गणिते कोलमडून पडत आहे. अशातच मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन रखडले असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे रखडलेले वेतन त्वरीत द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी राज्यात आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिला आहे.


