राजकारण

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दातच सुनावले; ज्यांना जायचे त्यांनी निघून जावे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

यावेळी त्यांना पक्षातील काही लोकं भाजपच्या वाटेवर असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जावे, असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे. ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची मोठी घोषणा केली होती.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यादिवशी मी घेतलेल्या या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते तसेच जनतेमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. मी घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन, काहींनी प्रत्यक्ष भेटून एकमुखाने मला आवाहन केलं.’

‘देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दाखवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.’

‘मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदा-या  सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करीन.’

‘आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनः जाहिर करतो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा निर्णय मागे घेत आहे. यापुढे पक्ष बांधणीसाठी तसेच जनमानसामध्ये अधिक जोमाने काम करेन. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश अपयशामध्ये आपण माझ्या सोबतीला राहिलात यासाठी मी आपला कायमचा ऋणी राहीन.’

त्यानंतर पत्रकारांनी पक्षातील काही लोकं भाजपच्या वाटेवर होते त्यांना थांबवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता का? त्यावर शरद पवार म्हणाले की, कोणीही जाणार असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. उलट अशा परिस्थितीत ज्याच्याकडे नेतृत्व असतं त्याला अधिक खंबीरपणे उभं राहून पक्षाला मजबूती द्यायची असते. मात्र अशी कोणतीही परिस्थिती आमच्या पक्षात नव्हती’

शरद पवार यांना भाकरी फिरवणार या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी भाकरी फिरवणार होतो पण भाकरीच थांबली, असं उत्तर दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button