राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळतील शुक्राचार्यांना शोधून काढा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नागपूर : महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळात काही झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गृह प्रकल्पांची गती कमी झाली. या शुक्राचार्यांना शोधून काढा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शुक्रवारी नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत स्मार्ट लकडगंज पोलीस ठाणे, गाळे आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, मी आमदार असताना पोलीस लाईन टाकळीत पोलीस गाळ्यांची वाईट अवस्था बघितली. पाठपुरावा करून हे गाळे तयार करून घेतले.
मुख्यमंत्री झाल्यावर २ हजार कोटी रुपये राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर राज्यभरात नवीन पोलीस गाळे उभारण्याचे काम हाती घेतले. राज्यात १ लाख सेवा निवास करायचे आहेत. गाळे तयार करण्याची महामंडळाची गती कमी आहे. येथे काही झारीतील शुक्राचार्य फाईलमध्ये अडचण आणतात. असेच होत राहिले तर दोन चार पिढ्या गेल्या तरी हे गाळे होणार नाही. त्यामुळे या शुक्राचार्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करा, अशी सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागाला केली.
लोकसंख्येनुसार नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव द्या : शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्येनुसार शहराच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करून पोलीस आयुक्तालयाने नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव द्यावा. त्याला मंजुरी दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
घरासाठी कर्ज योजना : मी मुख्यमंत्री असताना पोलिसांचेही स्वत:चे घर असावे म्हणून २० लाख रुपये सवलतीच्या दरात कर्जाची योजना आणली होती. परंतु सरकार बदलल्यावर ही योजना बंद पडली. आता आम्ही पुन्हा ही योजना लवकरच सुरू करणार आहोत. त्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत शेवटच्या टप्प्यात चर्चा सुरू आहे. पोलिसांचे आरोग्य शिबीर घेऊन त्यांचे डिजिटल आरोग्य कार्ड तयार केले जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.


