Uncategorized

१७ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पोस्ट करत निलेश राणेंनी उडवली पवारांची खिल्ली

मुंबई : गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आधी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातील उद्धव ठाकरेंबाबतच्या उल्लेखामुळे आणि नंतर त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे घडलेल्या घडामोडींमुळे चर्चेत राहिले आहेत.

तर दुसरीकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही अशीच खिल्ली भाजपाकडून उडवली जात असल्याचे समोर आले आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याच अनुषंगाने एक ट्वीट केले आहे. त्यात तब्बल १७ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं असून त्यासाठी त्यांनी १७ वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओचा आधार घेतला आहे. या व्हिडीओबरोबर निलेश राणेंनी “हीच परिस्थिती पवारसाहेबांची राजकारणातसुद्धा आली आहे”, असे ट्वीट केले आहे. हा व्हिडीओ १७ वर्षांपूर्वीचा म्हणजेच २००६ सालातला आहे. एका क्रिकेट सामन्यानंतरचा हा व्हिडीओ असून तेव्हा शरद पवार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे अध्यक्ष होते. त्यामुळे भारतात झालेल्या अनेक महत्त्वाच्या सामन्यांना शरद पवारांनी उपस्थिती लावली आहे. तेव्हा घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ निलेश राणे यांनी दिला आहे.

२००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईत पार पडला. ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला. सामन्यानंतर शरद पवारांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं. यावेळी विजेत्या संघाची ट्रॉफी हातात घेऊन शरद पवार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगची वाट पाहात उभे होते. त्यावेळी रिकी पाँटिंगने येऊन अक्षरश: शरद पवारांकडून ती ट्रॉफी ऐटीत मागितलीच. अर्थात, हे पाँटिंगने मिश्किलपणे केल्याचे व्हिडीओवरून वाटत होते. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघातल्या खेळाडूंनी ट्रॉफी घेऊन शरद पवारांना कॅमेऱ्यासमोरून बाजूला जायला सांगितलं. हा व्हिडीओ तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून क्रीडाविश्वाबरोबरच राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

दरम्यान, या व्हिडिओसोबत निलेश राणेंनी “शरद पवारांची अशीच अवस्था राजकारणात झाली आहे” असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतच्या चर्चा, राष्ट्रीय राजकारणातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे खुद्द शरद पवारांनीच स्पष्ट केल्यावरून हा टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button