वाढत्या महागाईत दिलासा LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. एलपीजी गॅसच्या किमतींत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खिशावरील भार काहीसा हलका होणार आहे. एलपीजी विकणाऱ्या कंपन्यांकडून दर स्वस्त करण्यात आले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी १ मे २०२३ रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत १७२ रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी १७७३ रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर १८५६.५० रुपयांना मिळत होता.
नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत ८३.५० रुपयांनी कमी झाली असून ती आता १७७३ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर १८५६.५० रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३ रुपयांवर कायम आहे. १ जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये १७७३ रुपयांना विकला जात आहे. आणि १ जून रोजी कोलकातामध्ये १८७५.५० रुपयांना मिळत आहे.
मुंबईतील दर : मुंबईत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर १७२५ रुपयांना विकला जात आहे, तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १९७३ रुपये आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १८५६.५० रुपयांवरून ८३.५० रुपयांनी कमी होऊन १७७३ रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस८३.५० रुपयांनी स्वस्त झाला असून १८०८.५० रुपयांवरून १७२५ रुपयांवर येऊन पोहोचला आहे. तसेच, चेन्नईमध्ये एलपीजी गॅस २०२१.५० रुपयांवरून ८४.५० रुपयांनी घसरून १९३७ रुपयांवर पोहोचला आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती काय : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजीच्या किमती मुंबईमध्ये ११०२.५० रुपये, दिल्लीमध्ये ११०३ रुपये, लेहमध्ये १३४०, भोपाळमध्ये ११०८.५०, जयपूरमध्ये ११०६.५०, बंगळुरूमध्ये ११०५.५० रुपये आणि श्रीनगरमध्ये १२१९ रुपये इतकी आहे.
विमान प्रवास होणार स्वस्त : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली आहे. किंमतीत सुमारे ६.६०० रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो. १ जूनपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींत कोणताही बदल केलेला नाही.


