‘लागबागच्या राजा’च्या पाद्यपूजनाने मुंबईत गणेशोत्सवाचा श्रीगणेशा

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या १०० दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वांनाच आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनचे वेध लागले आहेत. अशातच मुंबईतील अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि अवघ्या जगभरात ज्याची ख्याती आहे अशा ‘लालबाग राजा’ या बहुमानाच्या गणपतीचे पाद्य पूजन आज पार पडले. यंदा मंडळाने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हे पाद्यपूजन केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
‘नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागचा राजा’.. दरवर्षी राजाच्या दर्शनाला देशभरातून लाखो भक्त येतात.. लालबागच्या राजाची मूर्ती ही बाहेरून न आणता त्याच ठिकाणी घडवली जाते. आणि तिथेच बाप्पाचे पाद्यपूजन केले जाते.
दरवर्ष या पाद्य पूजन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो मुंबईकर बाप्पाचे चरणस्पर्श करण्यासाठी जातात. अत्यंत मोठा सोहळा केला जातो. पण यंदा मात्र काही कारणास्तव राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत बापपाचे पाद्य पूजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.
आज संकष्ट चतुर्थी निमित्ताने सकाळी ६ वाजता चिंचपोकळी येथील मूर्तीकारांच्या कार्यशाळेत अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यंदा ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अत्यंत खास असणार आहे.
‘लालबागचा राजा’ मंडळाने नुकतेच पाद्य पूजनाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले असून, भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.


