महाराष्ट्र

गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही; उपचारासाठी करावे लागते तारेवरची कसरत

पालघर : विक्रमगड व वाडा या दोन तालुक्यांचा हद्दीवर असलेल्या म्हसेपाडा या गावचा रस्त्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याकडे लक्ष देण्याची गरज सरकारला वाटत नसल्याने संतापाचे वातावरण आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास या गावातील एका नवजात चिमुकलीचा रस्त्याअभावी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. सरकार अजून किती बळी जाऊ देणार आहे, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

मलवाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या म्हसेपाडा या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. गारगाई नदीवर असलेल्या लहानशा बंधाऱ्यावरून जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागतो. अनेकदा पूरस्थितीत ट्यूबच्या साह्याने नदी पार करावी लागते. यावर सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही.

म्हसेपाडा गावातील नितीन चव्हाण यांच्या दीड महिन्यांच्या चिमुकलीची तब्येत सोमवारी रात्री अचानक बिघडली. मात्र तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने, टोपलेपाडा या लांबच्या व जंगलातील मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच या बाळाचा मृत्यू झाला. म्हसेपाड्याला पीक गावाशी जोडणारा मार्ग जवळचा व सोईचा आहे. मात्र येथील बंधाऱ्यावर फळ्या टाकून जीवघेणा प्रवास लोकांना करावा लागतो. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दहा लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र कंत्राटदाराने काम अर्धवट टाकल्याने हा मार्ग आधीपेक्षाही धोकादायक झाल्याचे स्थानिक सांगतात.

रस्त्याअभावी जाणारे बळी अत्यंत लाजिरवाणे आहेत, त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ ही घोषणा दिमाखात देणाऱ्या सरकारने आधी म्हसेपाडा गावाच्या दारात जाण्यासाठी रस्ता बांधावा, अशी मागणी केली जात आहे. या गावात तातडीने पुलाची मागणी मार्गी लावावी, तसेच बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कमलाकर भोईर यांनी केली आहे.

बंधाऱ्याची उंची वाढवून त्यावर स्लॅब टाकण्याचे काम आराखड्यात घेऊन सप्टेंबरपर्यंत ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. म्हसेपाडा या गावाची समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारमार्फत केला जाईल, असं विक्रमडच्या तहसीलदार चारुशीला पवार यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button