लैंगिक शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा ‘ओह माय गॉड २’

हिंदू संस्कृतीत शिव आणि शक्ती ही विनाश आणि पुनर्निर्मितीची प्रतीकं मानली गेली आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था आणि त्यांच्या मूळ प्रेरणा यांचं एक अद्भुत तितकंच वैशिष्टपूर्ण चित्रण आपल्या संस्कृतीत आपल्याला आढळतं.
म्हणूनच लयस्थितीची देवता असणाऱ्या शिवतत्वाच्या अर्धांगात सृजनाची देवता असलेली शक्ती सामावलेली पाहायला मिळते. प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनाच्या या क्रियेशी माणूस आदिम काळापासून जोडला गेला आहे. जसजशी सामाजिक उत्क्रांती होत गेली तसतसे याचे नवनवे पैलू उलगडत गेले. अर्थात त्यावर सभ्यतेची पुटं देखील चढली. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसह असलेल्या मैथुन या चौथ्या गरजेविषयी उघडपणे बोलणं टाळलं गेलं. त्याचे दुष्परिणाम काळाच्या विविध टप्प्यांवर दिसले आहेत. त्यामुळेच लैंगिक शिक्षण हे गरजेचं वाटू लागलं. याच शिक्षणाचं महत्त्व ओह माय गॉड २ हा चित्रपट पुराणांच्या माध्यमातून उलगडून सांगतो.
चित्रपटाची कथा सुरू होते उज्जैनमध्ये राहणाऱ्या कांतिशरण मुद्गल या माणसापासून. महाकाल मंदिराच्या परिसरात पूजा साहित्य आणि पर्यटनावर गुजराण करणारा कांतिशरण हा एक शिवभक्त आणि कुटुंबवत्सल माणूस. एक दिवस त्याच्या मुलाचा शाळेत हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आणि त्याच्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात येतं. व्हायरल व्हिडीओमुळे समाजातही त्याची अप्रतिष्ठा होते. त्यामुळे शाळेत लैंगिक शिक्षण गरजेचं असल्याची जाणीव झालेला कांतिशरण शाळेला आणि मुलाच्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना कोर्टात खेचतो. मग सुरू होतो तो कोर्टरूम ड्रामा. या सगळ्यात भगवान शिवशंकर त्याचे मार्गदर्शक म्हणून त्याची साथ देतात. तो आपल्या मुलाच्या मानहानीचा खटला जिंकतो का, लैंगिक शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरतो का, हे मात्र चित्रपटातच पाहावं लागेल.
११ वर्षांपूर्वी आलेल्या ओह माय गॉड या चित्रपटात आस्तिक-नास्तिक आणि श्रद्धेच्या संकल्पनांविषयी मांडणी करण्यात आली होती. इथे शिव-शक्तीच्या मिलनाचा आधार घेऊन लैंगिक शिक्षणाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ कथा पहिल्या भागाशी साधर्म्य साधणारी असली तरी इथेही एका विषयाला वाचा फोडण्यात आली आहे. लैंगिक शिक्षणाचे विविध पैलू, त्याचे दूरगामी परिणाम- दुष्परिणाम, समाजाची मानसिकता, वैचारिक विरोधाभास यांचं चित्रणही त्यात आढळतं. मात्र, पहिल्या चित्रपटासारखी बेमालूम सरमिसळ या चित्रपटात तितकीशी जमून आलेली नाही. त्यामुळे देव आणि भक्ताचं नातं व सामाजिक प्रश्नाचा उहापोह असे दोन समांतर धागे चित्रपटात ठसठशीतपणे दिसून येतात. त्यामुळे पटकथेचा प्रवाहीपणा प्रभाव पाडत नाही. चित्रपटाचे संवाद परिणामकारक लिहिण्यात आले आहेत. काही प्रसंगांमध्ये हळूहळू चिमटे काढत, कधी गुदगुल्या करत एक सामाजिक संदेश मांडण्याचं चोख काम संवाद करतात. चित्रपटातील सर्व गाणीही श्रवणीय आहेत. अमित राय यांची कथा असून त्यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अभिनयाबाबत बोलायचं झालं तर कांतिशरण झालेल्या पंकज त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. शंकरावर पराकोटीची भक्ती असलेला एक कुटुंबवत्सल पिता पंकज यांनी बेमालूमपणे साकारला आहे. त्यांना प्रतिवादी वकील झालेल्या यामी गौतम हिने चांगली साथ दिली आहे. मात्र, तिची व्यक्तिरेखा अजून उलगडता आली असती, असं वाटून जातं. अक्षय कुमार याने साकारलेले भगवान शंकरही ठिकठाक आहेत. त्याची वेशभूषा, केशभूषा यातून त्याने शिवशंकराला साकारण्याचा प्रयत्न केला आहे. काही अंशी तो यशस्वीही होतो. पण, त्याच्यावर कृष्णा वासुदेव यादव या त्याच्या ओह माय गॉडमधल्या व्यक्तिरेखेची छाप दिसत राहते. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजूही उत्तम आहे. उज्जैननगरीचं विविधांगी दर्शन विलोभनीय झालं आहे.
लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त लैंगिक संबंधांचं शिक्षण असा सरळ अर्थ नसून लैंगिकतेचं शिक्षण असा आहे. त्याची समाजाला आत्यंतिक गरज आहे, हे या चित्रपटातून नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक वेगळ्या धाटणीचा धाडसी प्रयोग म्हणून चित्रपट पाहावाच लागेल.



