मालमत्तेच्या वादातून धडा शिकवण्यासाठी पसरवली बॉम्बची अफवा; पुणे पोलिसांची तारांबळ

पुणे : पुण्यातील खडकी परिसरात एका घरामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याची माहिती एका व्यक्तीने गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिस कर्मचाऱ्यास दिली. त्यानंतर एकच खळबळ उडून बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्यासह पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गांभीर्याने तपास केला. मात्र, सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॉम्ब मिळून आला नसून सदर कृत्य हे संबंधित घरातील व्यक्तीला मालमत्तेच्या वादातून धडा शिकवण्यासाठी केले गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकारामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
याबाबतची माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या युनिट चार पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्यास अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीने गुरुवारी रात्री भेटण्यासाठी बोलवले. त्यानंतर त्यास पोलिस कर्मचारी भेटला असता, त्यांनी एक फोटो दाखवत संबंधित बॉम्बसदृश्य गोष्ट खडकी परिसरातील एका घरात लपवून ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच एटीएसचे पोलिस संबंधित व्यक्तीला शोधत असून तो घरात लपला असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यानी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिसांना देऊन, आणखी पोलिस कर्मचारी घटनास्थळी बोलून घेतले. त्यानंतर संबंधित घराची तपासणी केली असता, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आली नाही.
मात्र, घराच्या छतावर कुल्फीचे दोन ॲल्युमिनियमचे कोन आणि त्यात इलेक्ट्रिक वायरी मिळून आल्या. त्यामुळे याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, माहिती देणाऱ्या व्यक्तीने संबंधित कुटुंबातील व्यक्तींना मालमत्तेच्या वादातून धडा शिकवण्यासाठी कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, गुरवारी युनिट ४ चे कर्मचाऱ्यांना खडकी येथील एका इसमाच्या घरी संशयीत वस्तू असलेबांबत बातमी मिळाली होती. सदर ठिकाणी तात्काळ जाऊन संशयीत वस्तूची खातरजमा केली असता संशयास्पद काही आढळून आलेले नाही.



