Uncategorized

ठाण्याच्या क‌ळवा खाडी परिसरात दुमजली झोपड्यांची उभारणी; ठाणे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

ठाणे : आधी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमातून ठाणे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. परंतु शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागातील अतिक्रमण काही केल्या कमी होताना दिसून येत नसून क‌ळवा खाडी परिसरात खारफुटीवर भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेवर आता दुमजली झोपड्या उभारण्यात येत आहे. यामुळे पुराबरोबरच जिवितहानी होण्याचा मोठा धोका आहे.

ठाणे शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभुत सुविधा पुरविण्याबरोबरच महापालिकेकडून मोठे विकास प्रकल्प राबविले जात आहेत. रस्ते बांधणी, उड्डाण पुल उभारणी, सॅटीस पुल, तलावांचे सुशोभिकरण, असे अनेक प्रकल्प महापालिकेकडून राबविले जात आहे. ठाणे शहराला २६ किमीचा खाडीकिनारा लाभलेला आहे. या भागातील खारफुटीवर भराव टाकून त्यावर बेकायदा बांधकामे उभारणीचे प्रकार भुमाफियांकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. कळवा, साकेत परिसरात खाडी बुजवून त्याठिकाणी बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. खाडी पात्रापर्यंत या झोपड्या पोहचल्या आहेत. दिवसेंदिवस या झोपड्यांची संख्या वाढत असून यामुळे खाडीचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद झाले आहे. या झोपड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

खाडीकिनारी भागात अतिक्रमण होऊ नये म्हणून महापालिका स्मार्ट सिटी योजनेंतून खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोपरी, कळव्याचा काही भाग, साकेत, कोलशेत, गायमुख आणि वाघबीळ भागातील खाडी किनारी भागाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे खाडीकिनारी परिसर संरक्षित होण्याबरोबरच नागरिकांना विरंगुळा आणि मनोरंजनाचे नवे ठिकाण उपलब्ध झाले आहे. असे असले तरी ज्या भागात हा प्रकल्प राबविण्यात आलेला नाही, त्याठिकाणी अतिक्रमणाचे प्रकार सुरूच आहेत. तसेच क‌ळवा खाडी परिसरात खारफुटीवर भराव टाकून झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या. त्याठिकाणी आता दुमजली झोपड्या उभारणीची कामे सुरू आहेत. दलदल भागात दुमजली झोपड्या उभारण्यात येत असल्याने मोठी जिवीतहानी होण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच खाडीचे पात्र अरुंद होण्याबरोबरच अतिक्रमणामुळे खारफुटी नष्ट झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button