महाराष्ट्र

यंदा एकाच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेला राष्ट्रीय पुरस्कार, मृणाल गांजाळे ठरल्या मानकरी

पुणे : केंद्र सरकारकडून यावर्षीची ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. राज्यातून एकमेव पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून, यंदा राज्यातील एकाच शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन दिल्ली येथे प्रदान केले जाणार आहेत. मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आय.सी.टी. पुरस्कार मिळालेला आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचे सारे श्रेय आपले विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षक व आमच्या गावातील गावकऱ्यांना जाते अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button